भाषा नसलेली अवस्था म्हणजे प्राणवायू नसल्यासारखे : प्रा. डॉ. दासू वैद्य

लोकनेते देवराव चोंढीकर स्मृती व्याख्यानपुष्प

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
dasu-vaidya : भाषेतील एकएक शब्द शेकडो वर्षांच्या रियाजातून निर्माण होत असतो. भाषा हे सर्वांचे मूळ आहे. निसर्गाने वाचा दिली पण भाषा मानवाने निर्माण केली. त्यातून भाषा ही हळूहळू समृद्ध होत गेली व माणसाच्या कल्पना शब्दाने बदलत गेल्या. यशस्वी माणसाचे रहस्य म्हणजे भाषा. जगात जेजे व्यक्ती यशस्वी झाले, त्यांनी प्रभावी भाषा वापरली. भाषेमुळे अनेकांचे जगण्याचे प्रश्न सुटतात. भाषा नसलेली अवस्था म्हणजे प्राणवायू नसल्यासारखे आहे, असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील मराठी विभागप्रमुख, प्रथितयश, कवी, गीतकार प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी काढले.
 
 

y2Dec-Smruti
 
 
 
ते शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसदच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवंगत लोकनेते देवराव चोंढीकर यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त स्मृती व्याख्यान पुष्पात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दासू वैद्य यांच्यासमवेत शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे आधारवड माजी आमदार विजय चोंढीकर, विदर्भ साहित्य संघ पुसदचे सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजय माने, उत्कृष्ट निवेदक तथा सूत्रसंचालक डॉ. प्रेषित रुद्रवार उपस्थित होते.
 
 
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज व दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध चोंढीकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. दासू वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच डॉ. विजय माने यांच्या हस्ते प्रेषित रूद्रवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सारंग कोरटकर व महेंद्र अंभोरे यांनी सरस्वती स्तवन सादर केले.
 
 
अविरत चालणाèया स्मृती व्याख्यान पुष्पाच्या 38 व्या व्याख्यान पुष्पात ‘भाषा आणि आपण’ या विषयावर बोलताना ते आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले, भाषेचे विविध प्रकार आढळून येतात. जसे साहित्याची भाषा, कवी व गीतकाराची भाषा, देहबोलीची भाषा, बाल भाषा, समाज भाषेने जोडला जातो. असा एकही व्यवसाय नाही की जेथे भाषा वापरली जात नाही. भाषा लिहावी, भाषा बोलावी, भाषा वाचावी तेव्हाच ती अभिजात भाषा होईल. भाषा आणि संस्कृतीचे जवळचे नाते आहे. भाषेमुळे माणसाचा स्वभाव, उंची व संस्कृती समजते. आपल्या भाषेविषयी अभिमान बाळगावा. परंतु हा अभिमान बाळगताना भाषेचा न्यून्यगंड घेऊन फिरू नका, असा सल्ला प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी दिला.
 
 
डॉ. प्रेषित रुद्रवार यांनी प्रमुख वकत्यांचा परिचय करून दिला. या व्याख्यानपुष्पाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. गजानन जाधव यांनी केले. तर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयोजित व्याख्यानास मान्यवरांसह पुष्पावंती परिसरातील रसिक श्रोते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.