देवळी,
accident : देवळी एमआयडीसी परिसरातील ट्रान्सरील कंपनीजवळ झालेल्या अपघातात झेटवर्क कंपनीतील कामगार अफजल युनूस अन्सारी (३०,) रा. झारखंड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अफजल नेहमीप्रमाणे सायकलने कामावर जात असताना विरुद्ध दिशेने येणार्या आर. जे. ०९ जी. बी. ९३७० क्रमांकाच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
एमआयडीसी परिसरातील रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग असते. तसेच या भागातून मोठे ट्रेलर आणि ट्रकचा सततचा वर्दळ असते. त्यामुळे अशा पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चर्चा कामगारांमध्ये रंगली असून, एमआयडीसी प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद देवळी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.