दुर्मिळ ‘दंडकर्म’ परंपरेचा नवा वारस देवव्रत महेश रेखे!

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
वाराणसी,
Devvrat Mahesh Rekhe वाराणसीच्या पवित्र नगरीत १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी साधलेल्या अद्वितीय पराक्रमाची संपूर्ण देशात चर्चा रंगत आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदीनी शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचे दंडकर्म पारायण त्यांनी अवघ्या ५० दिवसांत, कोणत्याही खंड न पडता पूर्ण केल्याची ऐतिहासिक घटना जवळपास दोन शतकांनंतर प्रथमच घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देवव्रत यांचे कौतुक करत त्यांच्या या विलक्षण कामगिरीची दखल घेतल्याने या तरुण वेदाध्येत्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकू लागले आहे.
 
 
Devvrat Mahesh Rekhe
 
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले की, देवव्रत यांनी शतकानुशतके जपल्या गेलेल्या गुरु-शिष्य परंपरेचा सर्वोत्तम आदर्श पुढे ठेवला आहे. अखंड ५० दिवसांत, एकही चूक न करता, गुंतागुंतीच्या स्वर नमुन्यांसह हजारो वैदिक मंत्रांचे केलेले हे पठण ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणा आहे. पंतप्रधान मोदी यांनी काशीचे खासदार म्हणून या कर्तृत्वाचा अभिमान व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांना, गुरूंना आणि संपूर्ण वैदिक परंपरेला सलाम केला.
 
 
devavarat
 
 
घरातूनच मिळाले वैदिक संस्कार
अहिल्या नगर, महाराष्ट्र येथील देवव्रत रेखे हे वाराणसीतील संगवेद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे असून घरातच त्यांना वैदिक संस्कार मिळाले. देवव्रत गेल्या अनेक वर्षांपासून या कठीण परीक्षेसाठी तयारी करत होते. दररोज सकाळी चार तासांचे नियमित पठण आणि निष्ठेने साधना ही त्यांच्या तयारीची ओळख सांगणारी वैशिष्ट्ये होती.
 
 
वैदिक परंपरेतील “मुकुटमणी”
दंडकर्म पारायण हा वैदिक पठणातील सर्वात कठीण प्रकार मानला जातो. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदीनी शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचे ही गुंतागुंतीची रचना आहे. ‘दंडक्रम’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार पुढे-मागे एकत्रितपणे, वेगवेगळ्या आवर्तनांमध्ये, उच्चारांच्या अचूकतेसह पठण करण्याची मागणी करतो. स्वर, ताल, क्रमपरिवर्तन आणि ध्वनी यांच्या परिपूर्ण समन्वयासहच हे पठण शक्य होते. त्यामुळे हा प्रकार वैदिक परंपरेतील “मुकुटमणी” मानला जातो.
 
 
गेल्या २०० वर्षांत हा पराक्रम केवळ दोनदा घडल्याची नोंद आहे. प्रथम वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये दंडकर्म पारायण पूर्ण केले होते. आणि जवळपास दोन शतकांनंतर आता काशीमध्ये देवव्रत रेखेंनी ही परंपरा पुन्हा जागवली. २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या ५० दिवसांच्या कालावधीत रामघाटावरील वल्लभराम शालिग्राम संगवेद विद्यालयात त्यांनी अखंड पठण पूर्ण केले. यानंतर त्यांचा सन्मान सोन्याच्या ब्रेसलेटने आणि १,०१,११६ रुपयांनी करण्यात आला. हा सन्मान शृंगेरी शंकराचार्यांच्या आशिर्वादाचे प्रतीक आहे. या संपूर्ण पठणात अंदाजे एक कोटीपेक्षा अधिक शब्दांचा उच्चार करण्यात आला असल्याचे विद्वान सांगतात. वैदिक परंपरेतील कठोर शिस्त, मानसिक सामर्थ्य, स्मरणशक्ती, शब्दसंपादन आणि साधनेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून देवव्रत रेखे यांची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे.