भंडारा,
municipal-election-bhandara : जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आज झालेले शांततेत पार पडले असले, तरी उमेदवारांना अस्वस्थ करणारे होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चारही नगर परिषदा मिळून 46.28 टक्के मतदान झाले होते. दरम्यान संध्याकाळी चार नंतर मतदारांना हुरूप आल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या भल्यामोठया रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अंतिम आकडेवारी करू शकली नाही. मात्र हे मतदान 70 ते 75 टक्क्याच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आजच्या मतदानासोबतच नगराध्यक्ष पदाच्या 4 आणि नगरसेवक पदाच्या 98 लोकांचे भाग्य मशीन बंद झाले आहे.

जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चार नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी आज दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. चार नगराध्यक्ष आणि 98 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदानाला सुरुवात झाली तेव्हा, मतदारांचा ओघ मतदान केंद्राकडे बऱ्यापैकी होता. मात्र दुपारनंतर तो ओसरला. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात 29.85 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी 3.30 वाजता ही टक्केवारी 46.28 वर पोहचली होती. मतदानाच्या बाबतीत पवनी नगर परिषदेने आघाडी घेतली होती. येथे 3.30 वाजेपर्यंत 52.22 टक्के मतदान झाले. साकोली 52.14, भंडारा 41.99 आणि तुमसर 47.70 टक्के मतदानाची नोंद केली गेली. एकूण 1,70,315 मतदारांपैकी 78,817 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
दुपारच्या सुमारास मंदावलेली मतदानाची गती 4 वाजता नंतर मात्र वाढली. रिकामे दिसत असलेल्या मतदान केंद्रांवर अचानक जत्रा भरल्यागत मतदारांची गर्दी दिसू लागली. मोठमोठ्याला रांगा मतदान केंद्रावर लागल्या. त्यामुळे अचानकपणे जागृत झालेला मतदार चारही नगरपालिका क्षेत्रात पाहायला मिळाला. मतदानाची वेळ 5.30 वाजेपर्यंत असली तरी मोठ्या प्रमाणावर मतदार मतदान केंद्राच्या आवारात रांगेत उभे असल्याने त्या सर्वांचे मतदान झाल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजताची अंतिम आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.
झालेले मतदान आणि मतदान केंद्रावर असलेली गर्दी पहाता जिल्ह्यात 70 ते 75 टक्के मतदान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कुठेही मतदान प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. अनेक वयोवृद्ध मतदारांनी मतदान केंद्रात जात मतदानाचा हक्क बजावला. तरुण मतदारांमध्येही उत्साह पाहायला मिळाला. मात्र संध्याकाळच्या वेळी अचानक जागृत झालेला मतदार पाहून ही जागृती कशामुळे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्की आला असेल.
मतदान झाल्यानंतर तर्क वितरक आणि चर्चांना सुरुवात झाली. उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलल्या गेल्याने ही चर्चेची गुऱ्हाळे पुढील 18 दिवस अशीच सुरू राहणार. सोबत उमेदवारांचा जीव मात्र कायम टांगणीला असेल. मतदानानंतर आता कुणाची हवा हे सांगणारे अनेक चेहरे पुढे येऊ लागले आहेत.