देवळी,
municipal-election-postponed : देवळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अंतिमक्षणी स्थगित केल्याने देवळी शहर काँग्रेसतर्फे आज २ रोजी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. तुम्ही नगराध्यक्ष व सदस्यांचा झालेला खर्च निवडणूक विभागाने द्यावा अशी मागणी काँग्रेसने आज २ रोजी मोर्चा काढून केली.
या आंदोलनादरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा क्षीरसागर यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार, निवडणूक आयोगाने स्वतः आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रक्रिया सुरू होती. मात्र, अंतिम क्षणी कार्यक्रम बदलण्यात आले आहे. आयोग अज्ञानामुळे काम करतोय की सत्ताधार्यांच्या दबावाखाली आहे, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. काँग्रेसने निवडणूक स्थगितीमुळे उमेदवारांबरोबरच मतदारांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागल्याचा आरोप केला. अशा प्रकारची घटना भविष्यात पुन्हा घडल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील आणि त्यातून होणार्या सर्व नुकसानाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवडणूक प्रचारासाठी हॅण्डबिल, पोस्टर, बॅनर, प्रचार गाड्या, जाहीर सभा, रॅली यासाठी झालेला खर्च तसेच नगरपरिषदेत जाहिरात कर म्हणून भरलेली रकम परत करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली. उमेदवारांचे आर्थिक नुकसान निवडणूक आयोगाने भरून काढावे, अशी मागणी निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकार्यांमार्फत करण्यात आली.
यावेळी काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश वैद्य, जब्बार तंवर, सुनील बासू, पवन महाजन, अजय देशमुख, कृष्णकांत शेंडे, टिनू तंवर, अशोक राऊत, मोहन जांभुळकर, अर्चना मून, राजश्री देशमुख, जया गायधने, आशिष खोंड व काँग्रेसचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते व अनेक नागरिक उपस्थित होते