अमरावती जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान!

-९ पालिका व २ पंचायतींची निवडणूक -उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
अमरावती,
amravati-voting : जिल्ह्यातल्या ९ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजतापासून मतदान सुरू झाले. दुपारी ३.३० पर्यंत ४९.८० टक्के मतदान झाले होते. काही मतदान केंद्रावरच्या मतदारांच्या रांगा लक्षात घेता सांयकाळी ५.३० पर्यंत जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येणार आहे. मतदान यंत्र व मतदार यादीच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांतेत पार पडले. अध्यक्षपदाच्या एकूण ६४ तर सदस्यपदाच्या १०४८ उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले आहे. २१ डिसेंबरला होणार्‍या मतमोजणीत त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
 
 
chandur
 
अध्यक्षपदाच्या ११ तर सदस्यपदाच्या २४४ जागांसाठी ही निवडणूक झाली. सकाळी ७.३० पासूनच केंद्रावर ३६६ मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. ५.३० पर्यंतची वेळ होती. काही ठिकाणी मतदार रांगेत असल्याने मतदाना उशिर झाला. सर्वच ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत चांदूरबाजार नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी ५ तर १० प्रभागातल्या सदस्यपदाच्या ९२ उमेदवारांसाठी ४५.४१ टक्के, दर्यापूर येथील अध्यक्षपदाच्या ७ तर १२ प्रभागातल्या सदस्यपदाच्या ११५ उमेदवारांसााठी ४९.९१ टक्के, चांदूर रेल्वे येथे अध्यक्षपदासाठी ५ तर १० प्रभागातल्या सदस्यपदाच्या ८९ उमेदवारांसाठी ४६.४४ टक्के, नांदगाव खंडेश्वर येथील अध्यक्षपदाच्या ६ तर १७ प्रभागातल्या सदस्यपदाच्या ७३ उमेदवारांसाठी ५५.२६ टक्के, धारणी येथे अध्यक्षपदाच्या ८ उमेदवार तर सदस्यपदाच्या ५८ उमेदवारांसाठी ४६.६७ टक्के, धामणगाव येथे अध्यक्षपदाच्या २ तर १० प्रभागातल्या सदस्यपदाच्या ४२ उमेदवारांसाठी ५१.५९ टक्के, वरुड येथील अध्यक्षपदाच्या ९ तर सदस्यपदाच्या १०८ उमेदवारांसाठी ४८.४७ टक्के, अचलपूर येथे अध्यक्षपदासाठी ७ तर २० प्रभागातल्या सदस्यपदाच्या २२० उमेदवारांसाठी ४८.७० टक्के मतदान झाले होते. शेंदुरजनाघाट येथे दुपारी ३.३० पर्यंत अध्यक्षपदाच्या ६ तर सदस्यपदाच्या ७८ उमेदवारांसाठी ५७.७६ टक्के, मोर्शी येथे अध्यक्षपदाच्या ६ व १२ प्रभागातल्या सदस्यपदाच्या १२८ उमेदवारांसाठी ५०.३० टक्के, चिखलदरा येथे अध्यक्षपदाच्या ३ उमेदवार तर सदस्यपदाच्या ४५ उमेदवारांसाठी ७३.७९ टक्के मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सर्वच ठिकाणी जवळपास ६५ टक्के मतदान होण्याचा अंदाज अधिकार्‍यांना आहे. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे.
 
 
//अर्धा तास उशिरा मतदान
 
 
मोर्शी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ४० मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले. पण, गोपाळराव वानखडे विद्यालय मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने जवळपास अर्धा तास उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. त्याचप्रमाणे कसारपुरा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद झाल्यामुळे जवळपास अर्धा तास मतदार रांगेत उभे होते. शिवाजी कन्या शाळेत मतदान यंत्र बंद झाल्याची माहिती होती. दर्यापूर येथेही दोन यंत्र काहीकाळ बंद होते. निवडणूक प्रशासनाने लगेच मतदान यंत्र दुरुस्त करून सुरळीतपणे मतदान सुरू केले.