3.30 वाजेपर्यंत सरासरी 39.87 टक्के मतदान

* गडचांदुरात मतदाराने फोडले मतदान यंत्र * राजुर्‍यात मतदानाच्या दिवशीच पैसे वाटल्याचा आरोप

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर, 
chandrapur-voting : चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीतील एकूण 10 अध्यक्ष व 226 सदस्यांची निवड करण्याकरिता मंगळवारी मतदान झाले. सकाळी 7.30 वाजेपासून सुरू असलेल्या मतदानाची दुपारी 3.30 वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी 39.87 एवढी होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदार सुरूच होते. दरम्यान, गडचांदुरात मतदारानेच मतदान यंत्र फोडल्याची धक्कादायक घटना घडली. तर राजुर्‍यात मतदानाच्याच दिवशी पैसे वाटल्याचा आरोप झाला. तशी चित्रफितही प्रसार माध्यमांवर फिरत होती. वृत्त लिहिस्तोवर अन्य ठिकाणी शांततेत मतदान सुरू होते.
 
 
 
chandrpur
 
 
 
जिल्ह्यातील भिसी नगर पंचायतीत मतदानाचा उत्साह सर्वाधिक होता. कारण सकाळपासूनच तेथील मतदानाची टक्केवारी आघाडीवर होती. दुपारी 3.30 वाजेपर्यंत या नगर पंचायतीत 67.52 टक्के मतदान झाले होते. तर गडचांदूर नगर परिषदेचे मतदान सकाळपासूनच कमालीचे रेंगाळले होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तेथील मतदान अवघे 30.65 टक्के एवढे होते. तर दुपारी बुथ क्रमांक 5 मधील दोन मतदान यंत्र बंद पडल्याचीही माहिती होती.
 
 
नगर परिषद बल्लारपूर येथे दुपारी साडेतीन वाजेर्यंत 37.49 टक्के, भद्रावती 35.93, ब्रम्हपुरी 44.79, चिमूर 43.37, गडचांदूर 30.65, मूल 46.39, नागभीड 51.46, राजुरा 39.39, वरोडा नगर परिषदेत 34.53, तर भीसी नगर पंचायतीत 67.52 टक्के एवढे मतदान झाले होते.
 
 
सकाळी 7.30 ते 11.30 वाजेदरम्यान मतदानाची एकूण सरासरी 14.02 टक्के होती. तेव्हाही सर्वाधिक 22.59 टक्के मतदान भिसी नगर पंचायतीत झाले होते. तर गडचांदूर नगर परिषदेत सर्वात कमी म्हणजे, केवळ 8.61 टक्केच मतदान झाले होते. ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्नी व कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. राजुरा विधानसभेचे माजी आमदार तथा शेतकरी नेते वामन चटप यांनीही सपत्नीक मतदान केले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोडा येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदान केले. तसेच चिमुर येथील मतदान केंद्रावर आमदार किर्तिकुमार भांगडिया यांनी सहकुटुंब मतदान केले. राजुरा येथे आमदार देवराव भोंगळे यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक 9 च्या मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्र फोडणार्‍या युवकाला पोलिसांनी अटक केली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत केले होते. आरोपी विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी आहे.
 
आधी मतदान मग शुभ मंगल सावधान!
 
 
राजुरा : राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक जवाहर नगर येथे राहणारे साहिल सोळुंके यांनी आपल्या विवाहापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आधी मतदान केले. हळद लागली असताना आणि परिवारात विवाहाची लगबग असतानादेखील त्यांनी व या कुटुंबातील सर्वांनी मतदान करून एक चांगला संदेश दिला.
 
राजुर्‍यात पैसे वाटल्याची चित्रफित ‘व्हायरल’
 
 
राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप उमेदवाराचे वडील तथा अन्य नेत्यांनी 500 रुपयांच्या नोटा वाटत असलेली चित्रफित समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ झाली. तसेच मतदानाच्या दिवशीही तेथील भाजप पदाधिकार्‍यांनी पैसे वाटल्याची तक्रार काँग्रेसचे कामगार नेते सूरज ठाकरे यांनी संबंधित चित्रफितसह निवडणूक विभागाकडे केली.