गोंदिया,
evm-shutdown : जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतींसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. चारही ठिकाणी संध्याकाळी 3.30 पर्यंत सरासरी 45.54 टक्के मतदान झाले. सुरवातीला सकाळी मतदानाचा वेग मंद होता. मात्र दुपारनंतर यात वेग आला. चारही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. जिल्ह्यातील 4 नगराध्यक्ष आणि 94 नगरसेवकपदासाठी निवडणूक झाली. चारही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी 27 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
नगरसेवकपदासाठी चारही ठिकाणी 419 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान गोंदिया येथील प्रभाग क्रमांक 11 (ब), प्रभाग क्रमांक 3 (ब) आणि प्रभाग क्रमांक 16 (अ) तर तिरोडा येथील प्रभाग क्रमांक 10 (ब), मधील निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहे. आज पार पडलेल्या व 20 रोजी होणार्या नगरसवेकपदाच्या निवडणुकीची मतगणना येत्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे. चारही ठिकाणी सकाळी 11 वाजतापर्यंत मतदानासाठी मतदारांमध्ये फारसा उत्साह पहावयास मिळाला नाही. मात्र दुपारी 12 नंतर प्रत्येकच केंद्रावर गर्दी होताना दिसली. सालेकसा नगरपंचायतीत नगराध्यक्षसह 17 नगरसेवकपदासाठी दुपारी 3.30 पर्यंत सर्वाधिक 80.75 टक्के मतदान झाले. गोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षसह 17 नगरसेवकांच्या 17 जागांसाठी 68.65 टक्के तर गोंदिया नगरपरीषदेच्या नगराध्यक्षपदासह 41 नगरसेवक पदासाठी 42.01 टक्के मतदान झाले. तिरोडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सह १९ नगरसेवक पदासाठी 45.51 टक्के मतदान झाले.
राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडविला. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ तर शिवसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा गाजविली. इतर पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेत कॉर्नर सभा, रॅली व घरभेटीतून प्रचार करीत आपला उमेदवार कसा सक्षम आहे, असे सांगत विकासकामे कशी खेचून आणू याचा पाढा वाचला. आज पार पडलेल्या चारही ठिकाणच्या निवडणुकीत 446 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी याकरिता जिल्हा प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. काही केंद्रांवर संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान पार पडल्याने जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.
प्रचारतोफा अंतिम टप्प्यात असताना तिरोडा येथील प्रभाग क्रमांक 10 (ब), गोंदिया येथील प्रभाग क्रमांक 3 (ब), प्रभाग क्रमांक 11 (ब), आणि प्रभाग क्रमांक 16 (अ) मधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे तिरोड्यातील 3 उमेदवार आणि गोंदियातील 16 उमेदवारांकरिता 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे.