दुसरा पतीच पिंकीचा मारेकरी

-हत्याकांडाचा झाला उलगडा -गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
amravati-crime-news : महिलेची हत्या करणार्‍या आरोपीस अमरावती शहर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. दुसरा पतीच तिचा मारेकरी आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी संताजी नगर येथे राहणार्‍या नीलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे (नाकाडे) हिचा तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. अज्ञात इसमाने तिचा खून केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत होते. याबाबत राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास आरंभिला. या गुन्ह्यात कोणताही पुरावा मिळत नव्हता, त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने गुन्हा घडल्यापासून सतत गुन्ह्याचा सखोल तपास करून कौशल्यपूर्ण पद्धतीने तसेच गुप्त बातमीदार नेमून गुन्ह्याविषयी खात्रीलायक माहिती मिळवली. त्यानुसार हा गुन्हा मोर्शी रोडवरील अशोक कॉलनीतील ३२ वर्षीय रहिवासी नितीन सुरेश इंगोले याने केला असल्याचे लक्षात आले. त्यानुसार २ डिसेंबरला त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेऊन कसोशीने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
 
 
 
amt
 
 
 
 
पोलिसांनी घेतलेल्या त्याच्या बयाणानुसार तो व मृतक महिला यांचे प्रेमसंबध असून दोन महिन्याअगोदर आरोपीचे इच्छेविरुद्ध लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत होता. त्याला कंटाळून आरोपीने नीलिमा उर्फ पिंकी हिचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही डीव्हीआर व मृतक महिलेचा मोबाईल सोबत घेऊन गेला होता. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने मृतक महिलेच्या घरातील भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. ही कारवाई संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि इम्रान नायकवडे, सपोनि अनिकेत कासार (सायबर), सपोनि प्रियंका कोटावार (सायबर), पोउपनि गजानन सोनुने, अंमलदार दीपक सुंदरकर, सचिन बहाळे, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संभे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, राजीक रायलीवाले, नरेश मोहरील, प्रभात पोकळे, संदीप खंडारे, राहूल दुधे, सुषमा आठवले (सायबर) यांनी केली.