अमरावती,
navneet-rana : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. आता भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील हुमायून कबीर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवनीत यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. ‘पश्चिम बंगालला मी बांग्लादेश बनू देणार नाही. बाबरीच्या नावावर एकही विट रचली गेली, तर मी बंगालमध्ये येऊन उखडून टाकेल, मी बंगालमध्ये येत आहे’, असे नवनीत राणा यांनी या संदेशात नमूद केले आहे. त्यांच्या या संदेशाची चर्चा रंगली आहे. बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे आमदार हुमायून कबीर यांनी आपल्या प्रक्षोभक विधानाने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. जो कोणी बाबरी मशीद बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपने यासंदर्भातील व्हिडीओ प्रसारीत केला आहे. ६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा कबीर यांनी केली होती. समाज माध्यमांवर प्रसारीत झालेल्या एका व्हिडिओनुसार, कबीर यांनी बंगालमधील लोकसंख्येचे आकडे प्रसिद्ध करत म्हटले आहे की, ‘आम्ही सध्या येथील लोकसंख्येच्या ३७ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतो आणि बाबरी मशीद बांधली जाईपर्यंत आम्ही ४० टक्के लोकांपर्यंत पोहोचू’, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’चा नारा देतानाच बाबरी मशिदीचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. या देशात बाबर जन्माला येणार नाही आणि त्याचा वारसाही राहणार नाही. पुन्हा बाबरी मशीद बांधू दिली जाणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माझे आवाहन आहे, की त्यांनी रामनामाचा जप सुरू करावा. महाराष्ट्रात येऊन येथील राजकीय परिस्थिती पाहावी. या देशात श्रीराम होते, श्रीराम आहेत आणि श्रीरामच राहतील, असे नवनीत राणा आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या.