मुंबई,
Neha Sharma on ED's radar बेटिंग अॅप्सशी संबंधित मोठ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा हिला देखील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले आहे, गेल्या आठवड्यात दिलेले समन्स स्वीकारून ती २ डिसेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात उपस्थित झाली. ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या जाहिराती आणि प्रमोशनमधील तिच्या भूमिकेची तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे.
या प्रकरणात आधीच उर्वशी रौतेला, सोनू सूद, तसेच क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांचीही चौकशी झाली आहे. काहींच्या ११ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता जप्तही करण्यात आल्या आहेत. अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्ती यांनाही १५ सप्टेंबरला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला ही १xBet या संशयास्पद बेटिंग अॅपची ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ होती आणि संबद्ध जाहिरातीमुळे ती तपासाच्या कक्षेत आली.
ईडीच्या मते, १xBet हा प्लॅटफॉर्म भारतात कोणतीही परवानगी न घेता कार्यरत होता. सोशल मीडियावरील प्रमोशन, सरोगेट ब्रँडिंग आणि ऑनलाइन व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना भुरळ घालून या अॅपने मोठ्या प्रमाणात काळा पैसा फिरवला असल्याचा तपास सुरू आहे. नेहा शर्मा हिच्याकडून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जबाब नोंदवला जात असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.