तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Newborn found dead : नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना वडकी पोलिस ठाणे हद्दीतील किन्ही जवादे फाट्यावर मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत वडकी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित फोटो
प्राप्त माहितीनुसार, किन्ही जवादे फाट्यासमोर रस्त्यालगत 4 ते 5 महिन्यांचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती किन्हीजवादे गावात वाèयासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वडकी पोलिस ठाण्याला दिली.
यावेळी वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख, अमोल चौधरी, आकाश कुदुसे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पंचनामा केला. नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृतावस्थेत होते. पोलिसांनी नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात राळेगाव येथे पाठवला असून या घटनेतील अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
या रस्त्यालगत आढळलेले अर्भक पुरुष जातीचे असून ते 4 ते 5 महिन्यांचे असावे, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. ते अर्भक अन्य गावातील महिलेचे असावे व कुणीतरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रस्त्यालगत आणून टाकले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत वडकी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे यांचे मार्गदर्शनात अमोल चौधरी करीत आहेत.