निशांत अग्रवालला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

- उच्च न्यायालयाने केली जन्मठेपेची शिक्षा रद्द - पाकिस्तानी तरुणीच्या हनिट्रॅपमध्ये फसला हाेता निशांत

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nishant agarwal पाकिस्तानी तरुणीच्या हनिट्रॅपमध्ये फसून भारतीय क्षेपणास्त्र ब्रह्माेसविषयीची गाेपनीय माहिती पुरविल्याचा आराेप असलेला एअराेस्पेस कंपनीचा युवा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (28) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती. त्याने उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले हाेते. आज साेमवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा रद्द करुन सुधारित तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
 

निशांत अग्रवाल  
 
 
निशांत अग्रवाल हा उत्तराखंडमधील रुडकी, जि. हरिद्वार येथील मूळ रहिवासी आहे. ताे भारत व रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्माेस एअराेस्पेस कंपनीच्या प्रकल्पामध्ये सिस्टम इंजिनिअर पदावर कार्यरत हाेता. यादरम्यान ताे नागपुरातील साेनेगाव पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वलनगर येथे राहत हाेता. उत्तर प्रदेश दहशतवादविराेधी पथक (एटीएस) व लष्करी गुप्तचर संस्थेच्या (एमआय) पथकाने निशांतला आठ ऑक्टाेबर 2018 राेजी त्याला अटक केली हाेती. निशांत ब्रह्माेस एराेस्पेसच्या नागपूर युनिटमध्ये 2014पासून सीनियर सिस्टिम इंजिनीअर म्हणून काम करीत हाेता. या काळात त्याला नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने सबुक रिक्वेस्ट आल्या. त्याने त्या स्वीकारल्या व ताे हनी ट्रॅपमध्ये अडकला. या खात्यांच्या माध्यमातून निशांतकडील ब्रह्माेसबाबतची गाेपनीय माहिती फेटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली हाेती.
जिल्हा न्यायालयातून निशांतला जन्मठेप
ब्रह्माेस क्षेपणास्त्राविषयीची गाेपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे सिद्ध झाल्याने निशांत प्रदीप अग्रवाल याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 3 जून 2024 राेजी कलम 66-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्यातील कलम 3(1),(सी) अंतर्गत 14 वर्षे सश्रम कारावास, कलम 5(1),(ए),(बी),(सी), (डी) व कलम 5(3) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. शासकीय गुपिते कायद्यांतर्गत झालेली नागपुरातील ही पहिलीच शिक्षा मानली जात हाेती.
उच्च न्यायालयातून तीन वर्षांची शिक्षा
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर निशांतने उच्च न्यायालयात धाव घेऊन शिक्षेला आव्हाने दिले. न्यायालयाने दाेन्ही बाजू ऐकून घेतल्या. कलम 66-एफ अंतर्गत गुन्हा सिद्ध हाेत नसल्यामुळे या कलमाअंतर्गत देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. मात्र,शासकीय गुपिते कायद्यातील कलम 5(1),(ए) गुन्हा सिद्ध हाेत असल्यामुळे न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
असा अडकला निशांत
निशांतच्या खासगी लॅपटाॅपवर ब्रह्माेसबाबची गाेपनीय माहिती हाेती. नेहा शर्मा व पूजा रंजन या खात्यांवरून त्याच्याशी चॅटिंग करण्यात आले हाेते. त्याला काही ‘नकाे त्या अवस्थेत’फोटाे आणि व्हिडिओ पाठविण्यात आले हाेते. त्याला विदेशात नाेकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. ही दाेन्ही खाती पाकिस्तानातील इस्लामाबाद येथून ऑपरेट हाेत असल्याचे पुढे तपासात समाेर आले.nishant agarwal यादरम्यान त्याच्याकडून काही गेमिंग अ‍ॅप्स डाउनलाेड करवून घेण्यात आले. या अ‍ॅप्सवरून पाठविण्यात आलेल्या संदेशांवरील काही लिंक त्याने ओपन केल्या व त्याच्या लॅपटाॅपमध्ये स्टिलिंग मालवेअरचा शिरकाव झाला. या मालवेअरच्या माध्यमातून गाेपनीय माहिती इस्लामाबादमधील आयएसआय एजंटने हस्तगत केल्याचे ‘एटीएस’ने दावा केला हाेता.
लग्नाच्या सात महिन्यांनंतर संसार उद्ध्वस्त
मार्च 2018मध्येच निशांतचे लग्न झाले हाेते. लग्नाच्या सात महिन्यांनंतरच निशांतवर देशद्राेहाचा गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली. निशांत हा मूळचा उत्तराखंडमधील रुरकी येथील रहिवासी आहे. ताे कुरुक्षेत्रच्या ‘एनआयटी’चा पासआऊट आहे. ताे ब्रह्माेस मिसाइल युनिटमध्ये चार वर्षांपासून काम करीत हाेता. 2017-18 मध्ये युनिटने त्याला युवा वैज्ञानिक पुरस्कारानेही गाैरविले हाेते. ब्रह्माेसच्या सीएसआर, संशाेधन आणि विकास (आरअँडडी) ग्रुपचाही ताे सदस्य हाेता.