शेअर बाजार गुंतवणुकीत ७० लाखांचा गंडा

-कोल्हापूरच्या आरोपीस अटक -अमरावती सायबर पोलिसांची कारवाई

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
stock-market-investment-scam : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावावर तक्रारदाराची ७० लाख रुपयांच्या वर रकमेने ऑनलाईन फसवणूक करणार्‍या कोल्हापूर येथील आरोपीस अमरावतीच्या सायबर पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून क्यूआयबी, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओ आणि ओटीसी ट्रेडिंगद्वारे उच्च नफा मिळवण्याचे आश्वासन देऊन एकूण ७० लाख ०६ हजार ४७ रुपये २० पैशांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. यावरून ६ ऑगस्ट रोजी सायबर पोलिस ठाणे अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
 
 
amt
 
सदर गुन्ह्यात केलेल्या तपासात फिर्यादीची फसवणूक झालेल्या ७० लाखाच्या वर असलेल्या रकमेपैकी ५ लाख रुपये हे आयसीआयसीआय बँकेचा खातेदार असलेला कोल्हापूर येथील काश्वी ट्रेडींग कॉर्पोरेशनचा संचालक ४० वर्षीय कुलदीप अशोक सावरतकर यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे व आरोपीने ती रक्कम वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. परंतु या रक्कमेला लिन मार्क लावण्यात आला आहे. दरम्यान, सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार, त्यांचे सहकारी कर्मचारी विशाल यादव, अश्विन यादव, अनिकेत वानखडे यांचे तपास पथक तयार करून कोल्हापूर येथे रवाना करण्यात आले. कोल्हापूर त्याला ताब्यात घेतले. त्याची न्यायालयाकडून पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
 
गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्यात ११ लाख ७ हजाराची रक्कम ‘होल्ड’ करण्यात आलेली असून त्यापैकी १ लाख ९० हजार रुपये फिर्यादीला परत करण्यात आलेले आहे. उर्वरित रक्कमेबाबत न्यायालयीन आदेशाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक निरीक्षक प्रियंका कोटावार, सहाय्यक निरीक्षक अनिकेत कासार, कर्मचारी उल्हास टवलारे, निखिल माहुरे, विशाल यादव, अश्विन यादव, अनिकेत वानखडे व सुषमा आठवले यांनी केली आहे.