उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत रबीसाठी तीन पाणीपाळ्या; वेळापत्रक जाहीर

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
urdhva-painganga-project : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा लाभक्षेत्रातील बिगर सिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता 2025-26 मध्ये रबी हंगामात 3 पाणी पाळ्या देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. रबी हंगामात 3 पाणीपाळ्या देण्यात आल्या असून पाणीपाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
 
 
urdhv
 
 
 
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार, सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक खालीलप्रमाणे राहील. तथापी पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल.
 
 
उन्हाळी हंगाम 2025-26 करीता पाणीपाळी क्र. 1 ही 15 डिसेंबर 2025 रोजी, पाणीपाळी क्र.2 ही 8 जानेवारी 2026 रोजी, पाणीपाळी क्र.3 ही 5 फेब्रुवारी 2026, रोजी सोडण्यात येईल. त्यासाठी रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्यांचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत मुदतीत संबंधीत शाखा कार्यालयात दाखल करावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाèया व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.
 
 
काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाèया नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
 
 
शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतीम क्षेत्रास पाणीपुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही.
 
 
पाणीपाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणीवापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले. त्या लाभक्षेत्रावर नियमांनुसार पाणी मागणी, वसूली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.