तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Yardi English Medium School, उमरी येथील नामांकित ‘यार्डी इंग्लिश मिडियम स्कूल’मध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी भाड्याने घेतलेले कपडे चक्क सातवीच्या विद्यार्थिनींकडून शाळेतच धुवून घेण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी पालकांनी आधीच पैसे भरलेले असतानाही प्राचार्याने विद्यार्थिनींना कपडे धुवायला लावल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात नृत्य सादर करण्यासाठी सातवीच्या विद्यार्थिनींनी शाळेमार्फत कपडे भाड्याने घेतले होते. या प्रत्येक ड्रेससाठी शाळेने विद्यार्थिनींकडून 300 रुपये भाडे आधीच वसूल केले होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर Yardi English Medium School, 15 डिसेंबर रोजी शाळेत आलेल्या विद्यार्थिनींना प्रिन्सिपलने बोलावून घेतले आणि त्यांनी वापरलेले नृत्याचे कपडे धुण्यास भाग पाडले. शाळा हे शिक्षणाचे मंदिर मानले जाते, मात्र तिथे विद्यार्थिनींना अशा प्रकारे कामाला लावल्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्यांकडून शाळेत वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामासाठी कपडे धुवून घेणे हा बालहक्काचा भंग असल्याचे बोलले जात आहे. आधीच 300 रुपये भाडे घेतल्यानंतरही विद्यार्थिनींना शारीरिक कष्टाची कामे करायला लावणाèया अशा प्राचार्यावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही स्वच्छ कपडे आणले होते. मात्र मुलांनी घाईगडबडीत ते खराब केले. खराब कपड्यांचे भाडे जास्त लागेल, असे संबंधित दुकानदाराने सांगितले होते. त्यामुळे जास्तीचे पैसे लागू नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ते स्वच्छ करायला लावले.
- सिल्वर राजा
मुख्याध्यापक, यार्डी इंग्लिश मीडियम स्कूल