मतमोजणीसाठी ७२ कर्मचार्‍यांची नियुक्ती १५ टेबलवर ८ फेर्‍यांत मोजणी!

दुपारी होणार निकाल जाहीर

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड, 
72 employees have been appointed for the vote counting नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, एकूण ७२ अधिकारी व कर्मचार्‍यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी १९ डिसेंबर रोजी आदेश पारित करून मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी सहायक कर्मचारी, मतमोजणी पथक, संगणक पथक, सीलिंग कर्मचारी तसेच टपली मतपत्रिका मोजणी अधिकारी यांचा समावेश असून मतमोजणी प्रक्रिया काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल तर सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
 

karanjalad 
 
कारंजा—- मंगरूळनाथ मार्गावरील शेतकरी निवास येथे मतमोजणी पार पडणार असून, १५ टेबलवर ८ फेर्‍यांत मतमोजणी पूर्ण करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही आवश्यक खबरदारी घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदासह ३१ नगरसेवक पदांसाठी ८८ मतदान केंद्रांवर २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. एकूण ७० हजार ३३१ मतदारांपैकी ४३ हजार ७०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १२ नगराध्यक्ष पदासाठीचे आणि १२७ नगरसेवक पदासाठीचे असे एकूण १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी ईव्हीएम मध्ये बंद केले. निकालासाठी तब्बल १९ दिवस प्रतीक्षा करावी लागल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
 
 
मतमोजणीसाठी १८६ पोलिस तैनात
कारंजा लाड, 
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मंगरूळनाथ मार्गावरील शेतकरी निवास येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल यासाठी १५ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी १८६ पोलिस तैनात करण्यात आले आहे. यात ९ अधिकारी,९५ पोलिस कर्मचारी, स्टायकिंग फोर्स १२, एसआरपीएफ जवान १० आणि ६० होमगार्डचा समावेश आहे. २ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडलेल्या मतदानानंतर तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.