गडचिरोली,
ABVP's convention in Gadchiroli अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे 54वे प्रांत अधिवेशन येत्या 9, 10 व 11 जानेवारी रोजी ‘सुमानंद’ सभागृहात पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री तथा विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हे अधिवेशन विदर्भ प्रांताच्या युवा तरूणाईला नवी उर्जा व दिशा देणारे ठरेल. या अधिवेशनात विदर्भाच्या 120 तालुके व 119 मोठे सेंटरवरून एकूण असे 239 स्थानांवरून 350 महाविद्यालयातून 500 विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत.या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील.
गडचिरोलीतील पावनभूमिवर पहिल्यांदाच विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन विदर्भ प्रांताचे ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहेत. तसेच हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंतीचे 150 वे वर्ष असल्याने त्यांच्या जन्मस्थळ म्हणजे झारखंड मधील उलिहातू इथून आणलेले मातीचे कलश घेऊन अभाविप विदर्भात तीन यात्रा काढतील. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, अचलपूर जिल्ह्यातील धारणी व गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथून जनजाती गौरव यात्रा काढणार आहे व त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणार आहे. ही यात्रा 8 तारखेला सायंकाळपर्यंत गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा नगर येथे पोचणार. अधिवेशनाच्या भूमीला भगवान बिरसा मुंडा नगर असे नाव देण्यात येणार आहे. अधिवेशन दरम्यान भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. ज्यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्याच्या माध्यमातून वैदर्भीय संस्कृतीचे दर्शन होईल. या शोभा यात्रेचा शेवट जाहीर सभेत होणार आहे. या जाहीर सभेच्या मंचावरून विदर्भ प्रांतातील छात्रनेते विविध विषयांवर भाषण देणार आहेत. अशी माहिती स्वागत समिती सचिव गोविंद सारडा यांनी यांनी यावेळी दिली.
या अधिवेशनाच्या स्वागत समितीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे स्वागत समिती अध्यक्ष असतील, स्वागत समिती उपाध्यक्ष अॅड. प्राणोती निंबोरकर, प्रंचीत पोरेड्डीवार, स्वागत समिती सचिव गोविंद सारडा, सहसचिव प्रमोद पिंपरे व अनिल पोहणकर, कोष प्रमुख प्रशांत भृगवार असतील. त्याचप्रकारे या स्वागत समितीचे संरक्षक म्हणून जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, माजी खासदार डॉ. अशोक नेते, अॅड. प्रमोद बोरावार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेव हुसेंडी आदी संरक्षण समिती व स्वागत समिती सदस्य असतील, असे सांगीतले. म्हणजे भविष्यातील भावी नेतृत्व आणि ते नेतृत्व या अधिवेशना दरम्यान विदर्भाच्या कानाकोपर्यातून गडचिरोलीला येणार आहेत. ही गडचिरोलीकरांना लाभलेली मोठी संधी आहे. या संधीचे सोने करून विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला येणार्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे गडचिरोलीकरांनी स्वागत करावेत व अधिवेशनाला भरभरून सहकार्य द्यावेत, असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले आहे. पत्रपरिषदेला राष्ट्रीय मंत्री तथा विदर्भ प्रांत मंत्री पायल किन्नाके, गोविंद सारडा, सुनीता साळवे, संकेत मस्के, कारण चौधरी आदी उपस्थित होते.