मंथन हत्याकांडात तिघांना अटक

-टोळीयुध्दातूनच खून -मुलीलाही घेतले ताब्यात

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
manthan-massacre : सव्वा वर्षांपुर्वी शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत यश रोडगे नामक तरुणाचा खून झाला होता. त्या खूनप्रकरणात मंथनचा सहभाग पोलिसांना निष्पन्न झाला होता. दरम्यान त्याच खुनाचा वचपा काढण्यासाठी शुक्रवारी बोरनदी प्रकल्पाजवळ अंत्यत कृरतेने मंथन पाळनकरचा खून करण्यात आला. एका मुलीच्या माध्यमातून मारेकर्‍यांनी मंथनला बोरनदी प्रकल्पाजवळ बोलवले. त्यानंतर मारेकर्‍यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याला संपविले. या खूनाला टोळीयुध्दाची किनार आहे. या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी शनिवारी पहाटेपर्यंत तीन मारेकर्‍यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
 
 

संग्रहित फोटो 
 
संतोष पांडूरंग गाथे (२४, रा. राजापेठ), सुजल दिपक शर्मा (२१, रा. गोपालनगर) आणि सुजल पुरूषोत्तम जायभाये (२१, रा. गोपालनगर) यांना पोलिसांनी अटक केली असून गुड्डू रामटेके व यश पन्नासे असे पसार असलेल्या मारेकर्‍यांची नावे असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात मृतक मंथनचा भाऊ ओम पाळनकर याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खूनासह खूनाचा कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तक्रारीनुसार, सुमारे सव्वा वर्षांपूर्वी यश रोडगेच्या खून प्रकरणात मंथन हा सहभागी असल्यामुळे तो बालसुधार गृहात होता. त्यावेळी मारेकरी दहशत निर्माण करत होते. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी मंथन हा बालसुधार घरातून बाहेर आला. तो बाहेर आला तर गुड्डू रामटेके, यश पन्नासे, संतोष गाथे, सुजल शर्मा व सुजल जायभाये हे मंथनला जीवे मारण्याची धमकी देत होते, असे मंथनने त्याचा भाऊ ओम याला सांगितले होते. मंथन बाल सुधार गृहात असतानाही त्याच्या घरावर दगडफेकसुद्धा झाली होती. त्याबद्दल राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. दरम्यान मागील काही दिवसांपासून मंथन सोशल मीडियावर चॅटिंग करत होता. त्यावेळी त्याला लहान भावाने विचारले की, तू कोणासोबत चॅटिंग करतो आहे, तेव्हा मंथनने त्याला सांगितले की, तो दोन मुलींसोबत चॅटिंग करत आहे. त्या मुलींचे फोटोसुद्धा त्याने लहान भावाला दाखविले आणि या दोघी प्रेयसी असल्याचे सुद्धा त्याने सांगितले होते.
 
 
दरम्यान, १९ डिसेंबरला मारेकरी मंथनच्या घरासमोर चकरा मारत होते. सकाळी दहा वाजता मंथन घरातून बाहेर जात होता. त्यावेळी ओमने त्याला विचारले कि, तू कुठे जातो आहे तर त्याने सांगितले होते कि, मी माझ्या प्रेयसीला भेटायला जातो आहे. त्यानंतर काही वेळाने एका मित्राच्या दुचाकीवर बसून मंथन घरून निघून गेला आणि साडेचार वाजता मंथनचा खून झाल्याची माहिती ओमला पोलिसांकडून मिळाली. दरम्यान घटनेंनतर काही वेळातच तीन मारेकर्‍यांना नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे व पथक तसेच क्राईमचे पीआय संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने अटक केली.