नवी दिल्ली,
An Indian nurse won the lottery केरळमधील एका परिचारिकेच्या आयुष्याला युएईमध्ये नशिबाने अनपेक्षित वळण दिले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले असून तिने लॉटरीत मोठी रक्कम जिंकली आहे. अजमानमध्ये वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय नोंदणीकृत परिचारिका टिंटू जेसमोन हिने बिग तिकीट ड्रॉ सिरीज २८१ मध्ये १ लाख युएई दिरहम, म्हणजेच सुमारे २.४ कोटी रुपयांचा जॅकपॉट पटकावला आहे. मूळची केरळची रहिवासी असलेली टिंटू जेसमोन गेल्या पंधरा वर्षांपासून युएईमध्ये कार्यरत आहे. ३० नोव्हेंबर रोजी तिने दहा जणांच्या गटासह एकत्रितपणे विजेते तिकीट खरेदी केले होते. या गट तिकिटाचा क्रमांक ५२२८८२ होता. बिग तिकीटमध्ये गटात तिकीट खरेदी करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून, यामुळे सहभागी व्यक्तींना तिकीटाची किंमत तसेच जिंकलेली रक्कम एकमेकांत वाटून घेता येते.
आपण लॉटरी जिंकल्याचे समजताच जेसमोनच्या आनंदाला उधाण आले. गेल्या पाच वर्षांपासून ती सातत्याने बिग तिकीटमध्ये सहभागी होत होती. सुरुवातीला तिला सोशल मीडियावरून तसेच मित्र आणि सहकाऱ्यांकडून या लॉटरीबाबत माहिती मिळाली होती आणि त्यानंतर तिने नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. अखेर तिच्या चिकाटीला यश आले. मिळालेली बक्षीस रक्कम ती गटातील सर्व सदस्यांमध्ये समान वाटून घेणार असल्याचे तिने सांगितले आहे. याशिवाय, भविष्यात पुन्हा जिंकण्याच्या आशेने ती बिग तिकीट खरेदी करत राहणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, याच वर्षाच्या सुरुवातीला केरळमधीलच आणखी एका व्यक्तीने बिग तिकीट लॉटरीत कोट्यवधींची रक्कम जिंकली होती. बहरीनमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनू मोहनन याने बिग तिकीट राफलसाठी दोन तिकिटे खरेदी केली होती. विशेष ऑफरअंतर्गत त्याला एक तिकीट मोफत मिळाले होते. लाईव्ह टीव्ही शोदरम्यान ड्रॉ काढताना, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने त्याला थेट फोन करून ५३५९४८ क्रमांकाच्या तिकिटावर ३ कोटी युएई दिरहम जिंकल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकून मोहनन इतका अवाक झाला की त्याला ती खरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तीन वेळा विचारावे लागले.