चिखली,
Chikhli Municipal Council Election चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल रविवारी जाहीर होणार असून, प्रशासनातर्फे मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशानुसार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता तालुका क्रीडा संकुल येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. नगरपरिषदेच्या १४ प्रभागांसाठी एकूण ७ टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया दोन टप्प्यात विभागण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्र. १ ते ७ मधील मतदान केंद्रांची मोजणी होईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रभाग क्र. ८ ते १४ मधील केंद्रांची मोजणी केली जाईल. एकूण ६१ मतदान केंद्रांच्या मतांची मोजणी १० फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
मोजणी कक्षात प्रवेशासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यातील मोजणी संपल्यानंतर संबंधित उमेदवारांना कक्ष सोडावा लागेल, त्यानंतर पुढील प्रभागाच्या उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. मात्र, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी संपूर्ण १० फेऱ्या होईपर्यंत कक्षात उपस्थित राहू शकणार आहेत. अधिकृत प्रवेशिका (पास) असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मोजणी केंद्रावर सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलीस दलातर्फे प्रत्येक व्यक्तीची कडक तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र 'मीडिया कक्ष' स्थापन करण्यात आला असून, तिथे केवळ अधिकृत पासधारक पत्रकारांनाच प्रवेश मिळेल. सकाळी १० वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 'स्ट्रॉंग रूम' उघडली जाईल. मोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल.