वेध
loudspeaker आजचा काळ हा आवाजांचा आहे. रस्त्यावर हॉर्नचा गोंगाट, घराघरांत टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनची टिंग टिंग म्हणजे थोडक्यात भोंगा! याशिवाय राज्याच्या राजधानीत सकाळी 9 चा भोंगा अशी राजकीय ओळख असलेले खासदार संजय राऊत यांचा भोंगा! अनेकदा वाजला याचा भोंगा असेही उपरोधिकपणे म्हटले जाते. काही भोंग्यांवर बंदी आणण्याची मागणी राज ठाकरे वारंवार करतात. भोंग्यांचे अनेक प्रकार आहेत. पण, आजचा भोंगा खऱ्या अर्थाने वेगळाच आहे. हा भोंगा वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. भोंग्याच्या या आख्यायनात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ‘अग्रज धुळगाव!’ या गावाचा उल्लेख करावा लागेल. या गावात सकाळ, सायंकाळी वाजणारा भोंगा राजकीय नव्हे तर अभ्यासाचा! येथे गेल्या 3 वर्षांपासून पहाटे 5 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजतो. भोंगा वाजताच गावातील टीव्ही बंद होतात, मोबाईल बाजूला ठेवले जातात अन् विद्यार्थी अभ्यासाला बसतात. या अभिनव संकल्पनेने या गावाची ओळख आता ‘भोंग्याचे गाव’ अशी झाली आहे. यातून गावकऱ्यातील एकी दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झाले. त्यांची गुणवत्ताही वाढल्याने गावातील 53 विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले. दहावीतही ते अव्वल ठरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची अनेक स्पर्धां परीक्षांच्या माध्यमातून निवड झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या वतीने राबवल्या जात असलेल्या उपक्रमाचे गावकरी 100 टक्के पालन करतात. गावातील काही सुशिक्षित व्यक्ती दररोज 30 ते 40 घरी भेट देऊन पाहणी करतात. विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी मदतही करतात. पहाटे 5 ते 7 आणि सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपक्रम दररोज राबवला जातो.
आज जिथे शाळा, शिकवणी वर्ग (सॉरी कोचिंग क्लासेस) आणि अभ्यासाची महागडी साधनं असूनही मुलं अभ्यासापासून दूर जात असताना अग्रज धुळगावने एक वेगळा आदर्श ठेवला आहे. आपण धूळ या शब्दालाच नाक मुरडतो! पण, ज्या गावाच्या नावातच धूळ आहे. त्यांनी अभ्यासाची धूळ झटकून टाकण्याचा हा विडा उचलला असून ते त्यासाठी ‘अग्रज’ ठरले आहेत. अग्रज म्हणजे ‘मोठा’ आणि या अभियानात त्यांनी मोठ्याची भूमिका बजावली असे म्हटल्यास वावगे ठरू नये! इच्छाशक्तीच्या बळावर भोंग्याने क्रांती घडवली, असेच म्हणावे लागेल. या उपक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही तर या भोंग्याच्या आवाजात संपूर्ण गाव सहभागी आहे. भोंंगा वाजताच टीव्ही बंद होतात, मोबाईल बाजूला जातात. त्यामुळे त्या भोंग्याने लहान मोठ्यांना एक दिशा दिली आहे. सध्या मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करीत नाहीत. मोबाईलचे वेड लागले आहे, असे लहान मोठ्या, शिक्षित, अशिक्षित घरांमधली एकच कम्प्लेंट! अग्रज धुळगावने या प्रश्नावर जालिम उत्तर शोधून काढले आहे. सकाळ आणि सायंकाळच्या 4 तासातच गावात एक ऊर्जा निर्माण होते नव्हे सरस्वती प्रत्येक घरात डोकावल्याशिवाय राहत नसेल. इथे मुलांना अभ्यास कर असे म्हटले जात नाही. त्यांना अभ्यास करता येईल असे वातावरण गावाने दिले आहे. या भोंग्याचा आवाज केवळ कानांवर पडत नाही तो मनावर परिणाम करतो. तो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची आठवण करून देतो. या उपक्रमामुळे गावात हळूहळू बदल दिसू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलत आहेत. मोबाईलवर घालवला जाणारा वेळ कमी होतो आहे. टीव्ही पाहण्याची सवय मर्यादित होते आहे.loudspeaker परीक्षांचे निकाल सुधारत आहेत. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आहे. आमचं गाव आमच्या प्रगतीत सहभागी आहे. गाव आपल्या पाठीशी आहे असे बळ देते. महानगर, शहरात मोठमोठ्या सेमिनार, परिषदांमध्ये शिक्षणावर चर्चा होते. पण, अग्रज धुळगावने प्रत्यक्ष कृतीत उतरवले. कोणताही मोठा निधी नाही, कोणतीही योजना नाही, फक्त एक भोंगा आणि शिक्षणावरचा विश्वास आहे. मंदिरे, व्यक्ती, व्यक्तिमत्त्व, वस्तू, निसर्ग, आंदोलनं, वाद, गुन्हे आदींसाठी देशात अनेक गावे ओळखली जात असताना महाराष्ट्रातील अग्रज धुळगाव हे गाव अभ्यासासाठी ओळखले जात आहे. आज देशभरात ‘शांतता क्षेत्र’, ‘नो हॉर्न झोन’ अशा संकल्पना राबवल्या जातात. पण अग्रज धुळगावने ‘अभ्यास क्षेत्र’ निर्माण केलं आहे. जिथे आवाज बंद होतो आणि विचार सुरू होतात. गावागावात इतर भोंगे वाजल्यापेक्षा वा वाजवल्यापेक्षा प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात, शहरात असा भोंगा वाजला तर?
प्रफुल्ल क. व्यास
9881903765