जिल्हाधिकार्‍यांकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
Gadchiroli elections 2025, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने 21 डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रासह मतदान यंत्रांच्या सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) व ईव्हीएम साठवणूक व्यवस्थेची पाहणी केली.
 

 Gadchiroli elections 2025 
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी स्ट्राँग रूममधील प्रवेश-निर्गम व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, सुरक्षारक्षकांची तैनाती, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ईव्हीएम साठवणूक कक्षातील सुरक्षेच्या सर्व बाबींचा आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही त्रुटी उद्भवू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.यासोबतच कृषी महाविद्यालय परिसरातील बाह्य सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, प्रवेश नियंत्रण व मतमोजणीच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचीही त्यांनी तपासणी केली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
या पाहणीवेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासह पोलिस, महसूल व निवडणूक विभागातील अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी
 
 
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 अंतर्गत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, ईव्हीएम मशीनची स्थिती तसेच मतदारांसाठी उपलब्ध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला व मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत आवश्यक सूचना दिल्या. गडचिरोली नगरपरिषदेतील तीन प्रभागांसाठी 11 मतदान केंद्रांवर तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी 3 मतदान केंद्रांवर आज मतदान घेण्यात आले.