हनुमान केवळ बलाचे नव्हे, तर विवेक, सेवा व शांतीचे प्रतीक

- सद्गुरू ऋतेश्वर महाराज - खा. पटेल यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
गोंदिया, 
sadguru-riteshwar-maharaj : हनुमानजींना केवळ बलवान योद्धा किंवा सुपरमॅन म्हणून न पाहता, विवेक, सेवा आणि शांतीचे प्रतीक म्हणून समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सद्गुरू ऋतेश्वर महाराज यांनी केले. गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या हनुमंत कथेच्या पार्श्वभूमीवर ते आज शनिवारी २० डिसेंबर रोजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
 
 
 
KL
 
 
 
गोंदिया येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या मैदानावर २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य हनुमंत कथा आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय आध्यात्मिक कथावाचनाचा लाभ भाविकांना सद्गुरू ऋतेश्वर महाराज यांच्या मुखारबिंदूंतून मिळणार आहे. या आयोजनानिमित्त २० डिसेंबर रोजी सद्गुरूंचे गोंदिया येथे आगमन झाले. या पावन आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन खा. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. सद्गुरुंच्या गोंदिया आगमनाच्या निमित्ताने खा. पटेल यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खा. पटेल म्हणाले की, सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान प्रथमच सद्गुरू ऋतेश्वर महाराज यांची भेट झाली आणि त्या भेटीतून एक अलौकिक अनुभूती मिळाली. मी स्वतः हनुमान भक्त आहे. गुरुदेवांचे साधेपणा आणि आध्यात्मिक ऊर्जा मनाला स्पर्श करून जाते. वृंदावन येथे त्यांचा आश्रम असून त्यांचे जीवन अत्यंत तपस्वी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
पत्रकार परिषदेत बोलताना सद्गुरु ऋतेश्वर महाराज यांनी हनुमानजींच्या चरित्राचा सखोल अर्थ उलगडून सांगितला. हनुमानजी युद्ध नव्हे, तर समग्र शांतीचा मार्ग दाखवतात. संजीवनी बुटीसाठी अख्खा पर्वत उचलणे हे मानवता आणि करुणेचे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले. हनुमान कथा, राम कथा आणि कृष्ण कथा ऐकल्याने जीवनात आनंद, प्रेम आणि शांती प्राप्त होते, असे सांगत त्यांनी युवक आणि विद्यार्थ्यांना विशेष संदेश दिला. हनुमानजींचा आदर्श स्वीकारल्यास ताणतणाव, नैराश्य आणि नकारात्मकतेपासून मुक्त राहण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. फक्त बलवान असणे पुरेसे नाही, त्या बलाला विवेकाची जोड आवश्यक आहे. विवेकाशिवाय बुद्धिमत्ता धोकादायक ठरते, तर विवेकयुक्त शक्ती समाजात शांती आणि आनंद निर्माण करते, असे ते म्हणाले. हनुमानजींचे जीवनचरित्र शिक्षण, विज्ञान आणि आधुनिक जीवनाशी सुसंगत असून, वाल्मीकि रामायण, इतिहास आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हनुमानजींच्या व्यक्तिमत्त्वावर कथेदरम्यान सविस्तर विवेचन केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
 
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सद्गुरू ऋतेश्वर महाराज म्हणाले की, युवक ही देशाची खरी शक्ती आहे, आणि त्यांना नशा, हिंसा व नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी योग्य शिक्षण, सुदृढ संस्कार आणि कडक कायदे आवश्यक आहेत. तसेच महर्षी नारद हे सनातनात पहिले पत्रकार होते. त्यांचे आदर्श आपल्या समोर असून त्यांच्या शक्तीसारखी शक्ती आजच्या पत्रकारांमध्येही आहे. म्हणूनच पत्रकारांचे पाय एका ठिकाणी टिकू शकत नाही ते धावते असतात. अशा वक्तव्यातून त्यांनी पुढील सर्व उत्तर आपल्याला या कथावाचनातून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.