वर्धा,
illegal-sand-transportation : बोरगाव घाटातून वाळूचा उपसा करून मांडगाव मार्गाने हिंगणघाटकडे जात असलेली वाळूची अवैध वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. या कारवाईत १८ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई १९ रोजी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दोन ट्रॅटरच्या माध्यमातून बोरगाव घाटातील वाळू चोरी करून मांडगाव मार्गाने हिंगणघाटकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने सापळा रचला. यावेळी एम. एच. ३४ ए. पी. ४६०९ क्रमांकाचा ट्रॅटर व विना क्रमांकाचा ट्रॅटर येताना दिसला. पथकाने वाहतूक थांबविली असता चालक रुपेश टोंगे, मालक प्रशांत वानखेडे, लक्ष्मण घुसे, चंद्रकांत रिठे हे ट्रॅटरमध्ये वाळू घेऊन वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे नव्हता. सदर वाळू वेणा नदीतून उपसा केल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने ट्रॅटरसह वाळू असा १८ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत रुपेश टोंगे, लक्ष्मण घुसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर प्रशांत वानखेडे व चंद्रकांत रिठे हे पसार झाले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे ओमप्रकाश नागापुरे, अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, अमरदीप पाटील, पवन पन्नासे, रितेश कुर्हाडकर यांनी केली.