भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला!

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
India broke Australia's record भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकत नवा इतिहास रचला आहे. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला आणि ३–१ अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयासह भारताने टी-२० क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियाचा जुना विक्रम मोडला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून या मालिकेतही संघाची आक्रमकता स्पष्टपणे दिसून आली.
 
 
 
India broke Australia
निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने तब्बल २३१ धावांची भक्कम मजल मारली. या डावाचा कणा ठरले तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांची तुफानी फलंदाजी. तिलकने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर समन्वय साधत ७३ धावा केल्या, तर हार्दिकने अवघ्या २५ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. डावाची सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. या दमदार सुरुवातीचा आणि मधल्या व खालच्या फळीतल्या आक्रमक फलंदाजीचा फायदा घेत भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
 
 
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लक्ष्य गाठताना मोठा संघर्ष करावा लागला. क्विंटन डी कॉकने ६५ धावांची झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी आफ्रिकन संघ २०१ धावांवरच मर्यादित राहिला. भारतीय गोलंदाजांनीही निर्णायक क्षणी प्रभावी कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने चार षटकांत चार बळी घेत सामन्याची दिशा पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवली. जसप्रीत बुमराहने टापटीप गोलंदाजी करत अवघ्या १७ धावांत दोन महत्त्वाचे बळी मिळवले.
 
हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर भारताने २०२२ ते २०२५ या कालावधीत घरच्या मैदानावर सलग नऊ द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने २००६ ते २०१० दरम्यान सलग आठ मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता, जो आता भारताने मागे टाकला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय संघाचे टी-२० क्रिकेटमधील वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.