शिक्षकाची भन्नाट कल्पना!

वर्गातच जंगल सफारी, वर्ग खोलीत आले प्राणी, पाठीवर बसून विद्यार्थ्यांची सैर...

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
भंडारा,
jungle safari in the classroom "जंगल जंगल बात चली है पता चला है" हे गाणं बघून आपणही 'मोगली' प्रमाणे प्राण्यांच्या पाठीवर बसून जंगलाची सफर करावी, प्राण्यांसोबत संवाद साधावा, त्यांच्यासोबत धमाल मस्ती करावी, प्राण्यांच्या दुनियेत रमून जावे, असे लहानपणी प्रत्येकाला वाटते. मात्र आता हे ही शक्य झाले आहे. वर्ग खोलीतील बाकावर बसून अध्ययन करणारे विद्यार्थी आता चक्क वाघ, जिराफ आणि हत्तीवर बसून जंगलाची सफारी करीत आहेत, एक चिमुकला विद्यार्थी ब्लॅक पॅंथरला वर्गखोलीत घेऊन येतो तर एक माकडासोबत धमाल मस्ती करतो, फुलपाखराचे पंख लाभलेली एक विद्यार्थिनी आकाशात झेप घेते तर एक विद्यार्थी चंद्रावर पाऊल ठेवताच भारावून जातो, एक चिमुकला वाघाला विचारतो 'व्हॉट इज युअर नेम'.. आणि वाघ त्याला उत्तर देतो, 'माय नेम इज टायगर'! विश्वास नाही बसत ना. हो, शहरी भागातील नाही तर ग्रामीण भागातील शाळेत हे सर्व घडत आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने ही भन्नाट कल्पना साकारली आणि एआयच्या मदतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या आभासी दुनियाची सफर करून आणली.
 
 
 
jungle safari
 
 
सध्याच्या काळात एआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच अधिकाधिक तंत्रज्ञानभिमुख शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. शाळेतील वर्ग त्याच्या पारंपरिक सीमांच्या पलीकडे विकसित होत आहेत. जगभरातील शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रवेश करत असताना, अध्यापन आणि शिक्षणात एक मूलभूत परिवर्तन घडत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाचे धडे आजच गिरवण्यासाठी एका जिल्हा परिषद शाळेने अनोखा पुढाकार घेत प्राथमिक शिक्षणात नवा आदर्श निर्माण केला आहे.
 
 
 
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन रंजक व्हावे, प्राण्याची ओळख व इतर बाबीची ओळख व्हावी, ते त्यांच्या स्मरणात चिरकाल रहावे हा हेतू समोर ठेवून एआय तंत्रज्ञानाचा वापरले करून जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने भन्नाट असा व्हिडिओ तयार केला आहे. ज्यात विद्यार्थी जंगलात प्राण्यासोबत खेळताना, त्यांच्यावर बसून जंगल सफारी करताना व संवाद साधताना दिसत आहे. तसेच चंद्रावर माणूस चालल्यास कशाप्रकारे दिसते ह्याबाबत सुद्धा व्हिडिओ तयार केली आहे. काही विद्यार्थी आकाशात उडताना तर काही अंतराळाची सैर करताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नव्या युगाचे दालन खुले झाले असून पालकही विद्यार्थ्यांचे हे व्हिडिओ बघून भारावून गेले आहेत.
 
 
नाविन्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाभिमुख शिक्षणासाठी जिल्ह्यात नावारूपास आलेली सोरना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजच्या घडीला टेक्नॉलॉजीचा हब झाली आहे. या शाळेतील सहाय्यक शिक्षक कैलास चव्हाण यांनी ही अनोखी कल्पना साकारून विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षण सुरू केले आहे. कैलास चव्हाण यांनी यापूर्वी सुद्धा अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रयोग केले आहेत. तंत्रज्ञानातील प्रयोगाची दखल घेत दिल्ली येथील शैक्षणिक संस्था निपाने त्यांच्या ४ डी वर्ग खोलीवर डॉक्युमेंट्री तयार करून त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे हे विशेष.
 
 
एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना वेड लावलेले असताना जिल्हा परिषद सोरना शाळेत कॉन्व्हेंट मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची रीघ लागली आहे. तुमसरपासून २८ किमी अंतरावर असणाऱ्या सोरना या आदिवासी बहुल गावात इयत्ता ते चवथीपर्यंत शिक्षण दिले जाते. येथे दोन शिक्षक कार्यरत आहे. सहाय्यक शिक्षक सी. सी. मेश्राम व कैलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत शाळेच्या पटसंख्येत कमालीची वाढ केली आहे. सीबीएसई पॅटर्नसह आनंददायी व पोषक वातावरणात ४० नावीन्यपूर्ण उपक्रम, ४ डी वर्ग खोलीत अद्ययावत शिक्षण, टॅब आधारित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. सर्वार्थाने स्मार्ट असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचा लूकसुद्धा खऱ्या अर्थाने स्मार्ट बनविला आहे. येथील विद्यार्थी सूट, बूट, कोट अन् टाय लावून शाळेत येतात. त्यामुळेच पालकांचा शाळेप्रती वाढलेला विश्वास निश्चितच जिल्हा परिषद शाळांना नव संजीवनी देणारा आहे.
 
आता एआय शिक्षकांसाठी एक शक्तिशाली शस्त्र म्हणून उदयास येत आहे. यातून शिक्षणासाठी नवीन कवाडे उघडताना दिसत आहे, असाध्य गोष्टी एआय टूल्सचा वापर करून साध्य करता येत आहेत.jungle safari in the classroom विद्यार्थ्यांना केवळ प्राण्यांची ओळख होऊ नये तर ते चिरकाल स्मरणात राहावे यासाठी एआय टूल्सचा वापर करून मी हा व्हिडिओ तयार केला. अशा प्रकारच्या अभिनव शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला असून शिक्षणाचा दर्जा, गुणात्मक वाढ होत आहे.
कैलास चव्हाण, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, सोरणा