सातारा
Koyna Hydroelectric Project कोयना धरणातून पोफळी येथील जलविद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला लागलेली गळती अखेर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दुरुस्ती कामासाठी गुरुवारपासून कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन पूर्णतः बंद करण्यात आला असून, पुढील तीन महिने हे दोन्ही टप्पे बंद राहणार आहेत. परिणामी राज्याच्या महानिर्मितीच्या कोट्यातील सुमारे ६०० मेगावॉट वीज निर्मिती तात्पुरती बंद राहणार आहे.
१९६२ साली कार्यान्वित झालेला कोयना जलविद्युत प्रकल्प हा राज्यातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. एकूण १,९२० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पात चार टप्प्यांमध्ये वीज निर्मिती केली जाते. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ७० मेगावॉट क्षमतेची चार युनिट असून त्यातून २८० मेगावॉट वीज निर्मिती होते, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ८० मेगावॉट क्षमतेची चार युनिट असून त्यातून ३२० मेगावॉट वीज उपलब्ध होते. हे दोन्ही टप्पे एकाच भूमिगत पॉवरहाऊसमध्ये कार्यरत असून त्याठिकाणी पेल्टन टर्बाइनच्या साहाय्याने एकूण ६०० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते.
कोयना Koyna Hydroelectric Project धरणातील पाणी हेड रेस टनेलद्वारे पोफळी येथील पॉवरहाऊसमध्ये आणले जाते. येथे वीज निर्मितीनंतर ते पाणी टेल रेस टनेलद्वारे कोळकेवाडी धरणात सोडले जाते. मात्र, कोयना धरणातून पोफळीच्या वीज निर्मिती संचाला पाणी पुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागल्याने सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. ही गळती गंभीर स्वरूपाची असल्याने दुरुस्ती कामासाठी टप्पा एक व दोन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, Koyna Hydroelectric Project हे काम मागील सहा वर्षांपासून रखडले होते. अखेर आता पुणे येथील एका खासगी एजन्सीला दुरुस्तीचे काम देण्यात आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. गळती पूर्णपणे थांबवली जाईपर्यंत आणि बोगद्याची सुरक्षितता सुनिश्चित होईपर्यंत हे दोन टप्पे बंद ठेवावे लागणार असल्याचे प्रकल्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यात सध्या वीजेची मागणी सुमारे २५ हजार १८ मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. महानिर्मिती कंपनी, खासगी वीज उत्पादक आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही मागणी भागवली जाते. मात्र, कोयना प्रकल्पातील ६०० मेगावॉट वीज निर्मिती बंद राहिल्याने राज्य सरकारला पर्यायी वीज व्यवस्थेचा आधार घ्यावा लागणार आहे.याबाबत माहिती देताना पोफळीचे मुख्य अभियंता संजय चौपडे यांनी सांगितले की, आपत्कालीन बोगद्याला लागलेली गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे दोन टप्पे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारपासून शटडाऊन घेण्यात आला असून, या कालावधीत ६०० मेगावॉटची तूट भासणार आहे. या गैरसोयीवर उपाययोजना करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.