ओडेसा,
Russia missile attack on Ukraine दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहरावर रशियाने केलेल्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे शहरातील महत्त्वाच्या बंदर सुविधांचे मोठे नुकसान झाले असून या हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आणि २७ जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे हा हल्ला झाला असल्याची माहिती युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी दिली. बंदर परिसरात उभी असलेली एक बस थेट हल्ल्याच्या केंद्रस्थानी आली, त्यामुळे बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लागून अनेक वाहनांचे नुकसान झाले.

ओडेसा प्रांताचे प्रमुख ओलेह किपर यांनी सांगितले की रशियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून बंदराच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनियन सैन्यानेही प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून रशियन युद्धनौका आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. युक्रेनच्या जनरल स्टाफने या कारवाईची अधिकृत पुष्टी करत सांगितले की, कॅस्पियन समुद्राजवळ गस्त घालत असलेल्या रशियन ‘ओखोटनिक’ युद्धनौकेवर ड्रोन हल्ला करण्यात आला. याशिवाय कॅस्पियन समुद्रातील फिलानोव्स्की तेल आणि वायू क्षेत्रातील ड्रिलिंग प्लॅटफॉर्मलाही लक्ष्य करण्यात आले. ही सुविधा रशियाची तेल कंपनी लुकोइल चालवते. युक्रेनियन ड्रोनने २०१४ मध्ये रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमियातील क्रॅस्नोसेल्स्की भागातील रडार यंत्रणेलाही नुकसान पोहोचवले असल्याची माहिती आहे. या हल्ल्यांमुळे झालेल्या एकूण नुकसानाचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की रशिया आपल्या अटींवर युद्ध थांबवण्यास तयार आहे. पुतिन यांच्या मते, युक्रेनने शांतता हवी असेल तर शांतता चर्चेच्या अटींवरून माघार घ्यावी लागेल आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांवरील आपले दावे सोडावे लागतील. या वक्तव्यामुळे युद्ध लवकर थांबण्याची शक्यता कमी असून संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.