आमदार संजय खोडके यांचा अपघात

प्रकृती स्थिर, विश्रांतीचा सल्ला

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
sanjay-khodke-accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव, आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात त्यांना दुखापत झाली असून प्रकृती स्थिर आहे. सात दिवस विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
 
 
AMT
 
आ. संजय खोडके शनिवारी दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी कठोरा परिसरात गेले होते. भेटीगाठी घेऊन ते नेहमी प्रमाणे दुचाकीने परत गाडगेनगरकडे येत होते. पावणे चार वाजताच्या सुमारास कॉलनीतल्याच एक रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकील जबर धडक दिली. धडक बसताच आ. खोडके दुचाकीसह दूर फेकल्या गेले. हा सर्व घटनाक्रम लगतच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आजुबाजुच्या नागरिकांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. चारचाकी चालक लगेच खाली उतरला. या सर्वांना अपघातग्रस्त व्यक्ती आ. खोडके असल्याचे लक्षात आल्यावर त्यांची धावपळ झाली. चारचाकी चालक परिचीतच असल्याची माहिती आहे. लगेच आ. खोडके यांना शहरातल्या रिम्स दवाखाण्यात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या कमरेला मुका मार लागला आहे. त्यापेक्षा अन्य कोणतीच मोठी दुखापत झालेली नाही. त्यांना सात दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
 
 
घाबरण्याचे कारण नाही
 
 
अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्यानुसार एक दिवस त्यांच्या निगरानीत व सात दिवस विश्रांती त्यांनी सांगितली आहे. घाबरण्याचे कारण नाही. सध्या निवडणुकीचा काळ आहे. रविवारी पक्षाचा मेळावा आहे. या मेळाव्याला मी हजर राहणार आहे. सर्व स्नेहीजणांचे मनापासून आभार
-संजय खोडके
आमदार, विधान परिषद