ढाका,
Seven arrested in lynching of Hindu youth बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी युनूस सरकारने मोठी कारवाई करत सात संशयितांना अटक केली आहे. मैमनसिंग जिल्ह्यातील बालुका परिसरात दीपू चंद्र दास यांना चौकात जमावाने मारहाण करून फाशी देत जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बांगलादेशचे अंतरिम सरकार आणि मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शनिवारी अटक कारवाईची अधिकृत माहिती दिली. युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की, २७ वर्षीय सनातन हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या हत्येप्रकरणी रॅपिड अॅक्शन बटालियनने सात जणांना ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद लिमन सरकार, मोहम्मद तारेक हुसेन, मोहम्मद माणिक मिया, इर्शाद अली, निजुम उद्दीन, आलमगीर हुसेन आणि मोहम्मद मिराज हुसेन अकोन यांचा समावेश आहे. विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही लिंचिंगची घटना देशात आधीच तणावाचे वातावरण असताना घडली. गेल्या वर्षी जुलै महिन्यातील विद्यार्थी चळवळीतील प्रमुख नेते आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरली आहे.
१२ डिसेंबर रोजी ढाक्यात हादी यांच्यावर गोळीबार झाला होता आणि सिंगापूरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने, तोडफोड आणि हल्ले झाले. दीपू चंद्र दास यांच्या हत्येचा निषेध करत अंतरिम सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले की, नवीन बांगलादेशात अशा प्रकारच्या जमावहिंसेला कोणतेही स्थान नाही. या गुन्ह्यात सामील असलेल्या एकाही व्यक्तीला माफ केले जाणार नाही, असा इशाराही सरकारने दिला आहे. सरकारकडून सातत्याने नागरिकांना संयम राखण्याचे आणि हिंसाचार व द्वेष टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.