दिल्ली अग्रलेख
parliamentary session संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. शेवटच्या दिवशी विरोधकांनी नेहमीप्रमाणे गोंधळ घालून ‘हम नहीं सुधरेंगे’ हे दाखवून दिले. तरीही अन्य अधिवेशनाच्या तुलनेत यावेळचे अधिवेशन अतिशय उत्पादक ठरले. अनेक महत्त्वाची विधेयके सरकारला पारित करून घेता आली तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक विषयांवर सभागृहात चर्चाही झाली. विरोधकांनी नेहमीप्रमाणे घातलेल्या गोंधळामुळे अधिवेशनाला काही प्रमाणात गालबोट लागले. मात्र तरीही यावेळचे अधिवेशन आतापर्यंतच्या अन्य अधिवेशनाच्या तुलनेत छोटे असले तरी अतिशय चांगले झाले. संसदेच्या अधिवेशनाचा उद्देश राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी हा असतो, पण आजकाल विरोधकांना अभ्यासपूर्ण चर्चेत नाही तर सभागृहात गोंधळ घालण्यात रुची असते, असे वाटते. मुळात प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले, याचे भान विरोधी पक्षांच्या सदस्यांना उरले नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. सरकार चुकत असेल, जनतेच्या हिताच्या विरोधातील निर्णय घेत असेल तर त्याला आक्रमकपणे विरोध करण्याचा विरोधकांना अधिकार आहे, विरोधकांचा हा अधिकार कोणी नाकारत नाही.
चुकीच्या मार्गावर जाणाèया सरकारला योग्य मार्गावर आणणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. पण आपण विरोधी पक्षात आहोत म्हणून ऊठसूठ सरकारला विरोध करणे, सरकारने व्यापक देशहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे, विरोधी पक्षांचे काम नाही. पण आजचा विरोधी पक्ष आपली दिशा हरवून बसला आहे, त्यामुळे त्याची दशा होत आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक उपस्थित करत असणाèया सर्व विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. मतदारयादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्यावर सरकारने चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. या विषयावर सरकार चर्चा करणार नाही, चर्चेपासून पळ काढेल, असे विरोधकांना वाटत होते. पण सरकारने या विषयावर चर्चेची तयारी दर्शवत विरोधकांच्या हल्ल्यातील हवा काढून घेतली. एसआयआरवरील चर्चेचे निमित्त करत दोन्ही सभागृहांत गोंधळ घालायचा आणि हिवाळी अधिवेशनाचे कामकाज हाणून पाडायचे, अशी विरोधकांची व्यूहरचना होती, पण या विषयावर चर्चेची तयारी दर्शवत सरकारने ती हाणून पाडली. एसआयआरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन दिवस चर्चा झाली. या चर्चेत सर्व पक्षांच्या सदस्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. एसआयआर हे एका विशिष्ट समाजाच्या मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यासाठी आहे, असा अपप्रचार विरोधकांनी चालवला होता. एसआयआरवर विरोधक उपस्थित करत असलेल्या आक्षेपांना गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही सभागृहांत अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण उत्तर दिले.
या देशात अवैध मार्गाने घुसखोरी केलेल्यांना हुडकून काढण्यासाठी एसआयआर आहे, या देशातील कोणत्याही जातिधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचा यामागचा हेतू नाही, असे अतिशय समर्पक उत्तर देत अमित शाह यांनी विरोधकांच्या आक्षेपांतील हवा काढली. या देशाचा पंतप्रधान आणि राज्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार घुसखोरांना आम्ही देऊ शकत नाही, तर तो अधिकार या देशातील मतदारांचा आहे, हा शाह यांचा युक्तिवाद अतिशय बिनतोड असा होता.
एसआयआरमधून एका विशिष्ट समाजाच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा सरकारचा हेतू असता तर बिहारच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला दणदणीत विजय मिळाला नसता, कारण बिहारमध्ये मुस्लिम समाजानेही भाजपाला भरभरून मतदान केले आहे. वंदे मातरम्ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही अधिवेशनात अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा झाली. वंदे मातरम्वरील चर्चेत लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण सर्वोत्कृष्ट म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या तुलनेत लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपला प्रभाव पाडू शकले नाही. राहुल गांधींजवळ वक्तृत्व नाही आणि त्यांचा अभ्यासही फारसा नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेता भाषणासाठी उभा झाला तर सत्ता पक्ष अस्वस्थ होत असे. पण आता विरोधी पक्षनेता म्हणजे राहुल गांधी भाषणासाठी उभे झाले की, सभागृहातील वातावरण हलकेफुलके होते. एसआयआर व मतचोरीच्या मुद्यावरून राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोग आणि सरकारला घेरत होते, पत्रपरिषद घेत आरोप करत होते. पण एसआयआरवरील चर्चेत राहुल गांधी यांचे भाषण काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची निराशा करणारे होते. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा ते सादर करू शकले नाहीत. याचा दोष अमित शाह यांनी भोळ्याभाबड्या राहुल गांधींवर न टाकता त्यांना भाषण लिहून देणाèया चमूवर टाकला. असे करत शाह यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. राहुल गांधी यांना काही समजत नाही, स्वत:ची अक्कल नाही, जसे भाषण लिहून दिले जाते, तसे ते वाचतात आणि त्यांना भाषण लिहून देणारे त्यांच्यापेक्षाही बेकार आहे, असा टोला शालजोडीतून मारला. राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका वढेरा या जास्त प्रभावी असल्याचे या अधिवेशनात दिसून आले. राहुल गांधी यांना हटवून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व प्रियांका वढेरा यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षात अधूनमधून उगीच होत नाही.
भाजपा जेव्हा विरोधी पक्षांत होताा, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराजसारखे दिग्गज नेते विरोधी पक्षनेते होते, हे नेते भाषणासाठी उभे होत तेव्हा सत्ताधारी पक्षाला घाम फुटत असे. आता राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले की, ते काय बोलणार, आपल्याच पक्षाला तर अडचणीत आणणार नाही ना , याचा विचार करुन काँग्रेसच्या सदस्यांनाच घाम फुटतो. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा आपल्याच काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचे काम इमानेइतबारे केले आहे.
हिवाळी अधिवेशनात मनरेगा ऐवजी सुधारित जी राम जी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मनरेगा योजनेतून महात्मा गांधी यांचे नाव वगळण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला. पण महात्मा गांधी यांच्या सिध्दातांची आणि आदर्शाची हत्या काँग्रेसने केली आहे.parliamentary session अशी हत्या काँग्रेसने एकदा नाही तर अनेकदा केली. या विधेयकावरील मतदानाच्या वेळी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात जो गोंधळ घातला, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सांसदीय परंपरा काँग्रेसच्या सदस्यांनी पायदळी तुडवल्या, विधेयकाची प्रत फाडत त्याचे तुकडे अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने भिरकावण्यात आले. विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देणे ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांना कठीण झाले होते, त्यामुळे त्यांना आपली जागा सोडून पाठीमागे जावे लागले,आणि आपले भाषण पूर्ण करावे लागले. मात्र या गदारोळातही चौहान यांनी विरोधकांच्या आक्षेपांचे आणि आरोपांचे मुद्देसूद निराकरण केले.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या या बेशिस्त आचरणाबद्दल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांना तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करावी लागली. मात्र फक्त नाराजी व्यक्त करणे पुरेसे नाही, तर अशा सदस्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपल्या अशा वागणुकीचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. देशातील जनता आपल्याला वारंवार का नाकारते आहे, याचे कारण काँग्रेसने शोधले पाहिजे आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली पाहिजे. काँग्रेस सदस्यांची ही हताशा आणि निराशा ते 11 वर्षापासून सत्तावंचित झाल्यामुळे आहे. महत्वाचे म्हणजे आता आपण कधीच सत्तेवर येऊ शकत नाही, याची काँग्रेसची खात्री पटली असल्याचे त्यांच्या दोन्ही सभागृहातील वर्तनावरुन दिसून येते. याआधी भाजपही अनेक निवडणुका हरला होता, पण भाजपा कधीच हताश आणि निराश झाला नव्हता. मात्र काँग्रेसने आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला आहे. काँग्रेसने आपल्या वागणुकीत आणि नेतृत्वात बदल केला नाही तर काँग्रेसची स्थिती आणखी दयनीय झाल्याशिवाय राहणार नाही, हाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शोध आणि बोध आहे.
........................................