हवामान विभागाचा अलर्ट...पुढील ७ दिवस थंडी कायम

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
पुणे.
Weather department alert राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी तापमान ४.५ ते ५ अंश सेल्सिअसवर उतरल्याची नोंद आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानासोबत कडाक्याची थंडी आणि धुके या तीनही घटक राज्यभर दिसून येत आहेत. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाही थंडीचा परिणाम मतदारांवर जाणवला आहे. नाशिक आणि निफाडमध्ये तापमानात घसरण झाली असून नाशिकमध्ये ६.९ अंश तर निफाडमध्ये फक्त ४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद म्हणून याला महत्त्व आहे.
 
 
Weather department alert cold
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये आज दाट धुक्याने परिसर झाकला होता. शहराचा पारा १० अंशांखाली उतरल्याने मन आणि महेशा या नद्यांवर धुक्याची दाट चादर पसरली होती. या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली, तरीही बाळापूरकरांनी मतदानाच्या दिवशी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर गारठा कायम आहे. पुणे परिसरातही थंडीची लाट जाणवते.
 
गेल्या २४ तासांत पुण्यातील तापमान ८.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. आज हवामान कोरडं राहील असे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील दिवसांत तापमान कमी राहण्याची शक्यता असून कमाल तापमान २९ आणि किमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातील पाषाणमध्ये ८ अंश, लोहगाव १३ अंश, चिंचवड १४ अंश, मगरपट्टा १५ अंश आणि कोरेगाव पार्कमध्ये १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात काहीसा वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर मोठे बदल अपेक्षित नाहीत. तर किमान तापमानातील घट पुढील सात दिवस सध्याच्या पातळीवर राहणार आहे. नागरिकांनी थंडीत स्वतःची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.