सिंधुदुर्ग
BJP in Sawantwadi Municipal Council सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून या निकालांनी स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवली आहे. विशेषतः सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या श्रद्धा भोसले यांनी मिळवलेल्या विजयामुळे शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाने सत्ता स्थापन केली असून नगराध्यक्ष पदावर श्रद्धा भोसले विजयी झाल्या आहेत. नगरसेवक पदाच्या निकालांमध्ये भाजपचे ११ उमेदवार विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाला ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली या नगरपंचायतींसाठी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. तब्बल ७४ टक्के इतक्या विक्रमी मतदानामुळे मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत मोठी उत्सुकता होती. या निवडणुकीत राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर शिंदे गटाकडून निलेश राणे सक्रिय होते. महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षही आपापल्या उमेदवारांसह मैदानात उतरले होते. त्यामुळे कोणत्याही आघाडीपेक्षा प्रत्येक पक्षाची स्वतंत्र ताकद या निवडणुकीत स्पष्टपणे समोर आली.
निवडणूक प्रचारादरम्यान निलेश राणे यांनी भाजपावर जोरदार टीका करत पैशांचा गैरवापर आणि राजकीय संस्कृती बिघडवल्याचे आरोप केले होते. त्यांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, अद्याप या तक्रारीवर ठोस कारवाई न झाल्याने न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, सावंतवाडीत पहिल्या फेरीत ठाकरे गटाच्या सीमा मठकर आघाडीवर असल्या तरी अंतिम फेरीत भाजपच्या श्रद्धा भोसले यांनी बाजी मारत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. मालवण पालिकेच्या निकालांमध्येही विविध प्रभागांमध्ये भाजपा, शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना संमिश्र यश मिळाले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.