देवळी,
Deoli-Municipal Council Election Results : देवळी नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून या निकालाकडे वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत जनशती आघाडीचे (अपक्ष) उमेदवार किरण ठाकरे यांनी आघाडी राखत विजय मिळविला. किरण ठाकरे यांनी ५८९३ मते प्राप्त केली तर भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस यांना ४२६९ मते मिळाली. १६२४ मतांचा जोगावा ठाकरे यांना मिळावा.
जिल्ह्यात देवळी नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवारावर आक्षेप घेतल्याने येथील निवडणूक दुसर्या टप्प्यात झाली. आज झालेल्या मतमोजणीत ठाकरे यांना नगराध्यक्ष म्हणून देवळीकरांनी निवडून दिले असले तरी नगर पालिकेत भाजपाचेच नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश वैद्य यांना केवळ ९९६ मते मिळाल्याने त्यांना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. उर्वरित दोन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
सभागृहात भाजपला बहुमत असले तरी अध्यक्ष अपक्ष विजयी झाले नगरपरिषद सदस्य निवडणुकीत भाजपाने १६ जागांवर विजय मिळवून संख्याबळ सिद्ध केले तर काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले. अत्यंत कमी मतांच्या फरकाने काँग्रेसचे अनेक दिग्गज पराभूत झाले. माजी नगरसेवक सुनील बासू यांना भाजपाचे उमेदवार राहुल चोपडा यांनी पटकले. या शिवाय काँग्रेसचे पवन महाजन, जयश्री देशमुख, माजी नगराध्यक्ष जब्बार तवर यांना पराभवाचा धक्का बसला.
भाजपाकडून अनेक नवे चेहरे सभागृहात दाखल झाले. मात्र अध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाच्या शोभा तडस यांचा पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे विजयी उमेदवार प्रभाग १ : प्रेमेंद्र ढोक, शीतल तरेकर, प्रभाग २ : अनिल कारोटकर, प्रभाग ३ : विलास जोशी, मनीषा लोखंडे, प्रभाग ४ : राहुल चोपडा, विभावरी बजाईत, प्रभाग ५ : संतोष भोयर, मंगला पिंपळकर, प्रभाग ६ : विजय गोमासे, विश्वजिता पोटदुखे, प्रभाग ७ : उमेश कांबडी, शुभांगी कुर्जेकर, प्रभाग ८ : रेखा कारोटकर, प्रभाग ९ : ललिता धुर्वे, प्रभाग १० : ज्योती खाडे तर काँग्रेसचे विजयी उमेदवार प्रभाग २ : अर्चना मून, प्रभाग ८ : स्वप्नील कामडी, प्रभाग ९ : मिलिंद देशमुख, प्रभाग १० : अशोक राऊत विजयी झाले असून भाजपाचे १६ तर काँग्रेस ४ नगरसेवक निवडून आले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना किरण ठाकरे म्हणाले हा विजय माझा नसून देवळीच्या जनतेचा आहे. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास विकास कामांतून सार्थ ठरविणार आहे. सभागृहात भाजपाचे संख्याबळ असले तरी विकासाच्या मुद्यांवर सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. देवळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिली.