तुळजापूर,
Gangane's victory in Tuljapur तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारतीय जनता पक्षाने आपला गड कायम राखत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे उमेदवार विनोद ऊर्फ पिंटू गंगणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे तुळजापूर मतदारसंघात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा प्रभाव अद्यापही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीदरम्यान विरोधकांनी गंगणे यांच्यावर असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित केला होता. प्रचाराच्या काळात या विषयावरून वातावरण तापले होते आणि राजकीय आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले होते. मात्र, निकालातून मतदारांनी या आरोपांपेक्षा विकासकामांना आणि भाजपच्या नेतृत्वाला अधिक महत्त्व दिल्याचे चित्र समोर आले आहे. तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून पिंटू गंगणे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर हे थेट एकमेकांसमोर होते. मतमोजणीनंतर गंगणे यांनी अमर मगर यांचा १,७७० मतांनी पराभव करत विजय खेचून आणला. निवडणुकीच्या काही दिवस आधीच दोन्ही गटांमध्ये मोठा वाद आणि गोंधळ झाला होता, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीतही गंगणे यांनी संघर्षावर मात करत बाजी मारली आहे.
पिंटू गंगणे यांचे नाव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आले होते. या प्रकरणात ते आरोपी असून सध्या जामिनावर मुक्त आहेत. ऑगस्ट महिन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुळजापूर दौऱ्यावर आले असताना गंगणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी १,८६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कारादरम्यान बावनकुळे यांनी गंगणे यांना जवळ बोलावून सन्मान केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवरही भाजपने गंगणे यांना उमेदवारी दिली आणि अखेर मतदारांनी त्यांना विजयी करत भाजपचा तुळजापूरचा गड कायम राखला आहे.