पांजरा परिसरात अल्पवयीन सारस पक्ष्याचा मृत्यू

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने की विषबाधेने? कारणांचा तपास सुरू

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
Bird Death गोंदिया तालुक्यातील पांजरा शेत परिसरात एका अंदाजे ३—ते ४ महिने वयाच्या अल्पवयीन सारस पक्ष्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने की विषबाधेमुळे झाला, याबाबत तपास सुरू आहे.
 

Gondia, Panjra, Juvenile Crane, Bird Death, 
दुर्मिळ असलेले सारस पक्षी महाराष्ट्रात प्रामुख्याने गोंदिया जिल्हा व लगतच्या भंडारा जिल्ह्यात आढळतात. विशेष म्हणजे, सारस पक्ष्यांची घरटी व नियमित प्रजनन करणार्‍या जोड्या केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात. पावसाळ्यात हे पक्षी धानशेतात घरटी करून अंडी घालतात व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पिलांना घेऊन शेत परिसरात विचरण करतात. सन २०२५ च्या विणी हंगामात जन्माला आलेल्या पिल्लांपैकी कामठा,—झिलमिली,—पांजरा परिसरातील हा पिल्लू एका शेतकर्‍याला अस्वस्थ अवस्थेत चालत येताना दिसला. काही वेळातच त्या पिल्लचा तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती वन विभाग व सेवा संस्थेला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभाग व सेवा संस्थेचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून मोक्का पंचनामा करून प्राथमिक शहानिशा करण्यात आली. मृत सारस पक्ष्यास पुढील तपासासाठी गोंदिया येथील पॉलिक्लिनिकमध्ये शवविच्छेदन व प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया उपवनसंरक्षक पवन जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. घटनास्थळी मानद वन्यजीव रक्षक व सेवा संस्थेचे सावन बहेकार, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, बीएनएचएस संस्थेचे मुकुंद धुर्वे, सेवा संस्थेचे अभिजीत परिहार, कन्हैया उदापुरे, वनरक्षक मुकेश मेहर तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. शवविच्छेदन व तपासणीची कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी देवेंद्र कटरे व रहांगडाले यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
कुडवा वन उद्यान परिसरात मानद वन्यजीव रक्षक, एनटीसीए प्रतिनिधि, गोंदिया वन विभागाचे उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी यांचे उपस्थितीत मृत सारस पक्षावर दहन क्रिया करण्यात आली.
पांजरा गाव शिवारात सारस पक्षीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पक्षी ३ ते ४ महिने वयाचा असावा, वनविभाग व पशुवैद्यकीय चमुने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. डी. कटरे व त्यांच्या सहकार्‍यांनी शवविच्छेदन केले. सारसाचा मृत्यू आजारपणामुळे झाला असावा, असा अंदाज डॉ. कटरे यांनी व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सारस पक्षाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सांगता येईल.
- दिलीप कौशिक
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) गोंदिया