अनिल कांबळे
नागपूर,
Ippa gang, कुख्यात गुंड इप्पा, त्याचे भाऊ नाैशाद, इर्शाद आणि त्यांच्या टाेळीने डाेबीनगर परिसरात उभ्या केलेल्या अनधिकृत साम्राज्यावर पाेलिस आणि मनपा प्रशासनाने हाताेडा चालवला.पाेलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत तब्बल 50 अनधिकृत घरे जमीनदाेस्त करण्यात आली आहेत. पाेलिसांनी या परिसरात राबवलेल्या ‘काेम्बिंग ऑपरेशन’नंतर या कारवाईची पायाभरणी झाली हाेती.
गुन्हेगारांनी बळकावलेल्या जमिनीवर आलिशान बांधकामे करून आपले अड्डे तयार केले हाेते. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच पाेलिस ताफफ्यासह बुलडाेझर घटनास्थळी दाखल झाले आणि दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. पाेलिसांनी जेव्हा या घरांची झडती घेतली, तेव्हा धक्कादायक बाबी समाेर आल्या. बाहेरून साध्या झाेपडीसारखी दिसणारी ही घरे आतून सर्व आधुनिक सुखसाेयींनी सज्ज हाेती. पाेलिसांपासून वाचण्यासाठी आणि गुन्हेगारांना लपवण्यासाठी या घरांमध्ये विशेष ’गुप्त तळघरे’ तयार करण्यात आली हाेती. या अड्ड्यांचा वापर एमडी पावडर (ड्रग्ज) आणि गांजा विक्रीसारख्या अवैध धंद्यांसाठी केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
इप्पा आणि त्याच्या टाेळीने डाेबीनगर ते पाचपावली रेल्वे मार्ग परिसरात सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावून आपली दहशत निर्माण केली हाेती. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, गुन्हेगारांमध्ये माेठी खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, पाेलिस प्रशासनाकडून गुन्हेगारीच्या बळावर उभ्या राहिलेल्या प्रत्येक अनधिकृत बांधकामावर अशीच कारवाई केली जाईल. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाेलिस प्रशासनान कटिबद्ध आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या माेहिमेत तहसील, पाचपावली आणि काेतवाली पाेलिस ठाण्यांचे निरीक्षक आणि माेठा पाेलिस फौजाटा तैनात करण्यात आला हाेता. या कारवाईने इप्पा टाेळीचे आर्थिक कंबरडे माेडले आहे. या कारवाईमुळे वस्तीतील छाेट्या गुन्हेगारांनी शहरातून पळ काढला आहे.