वॉशिंग्टन,
Jeffrey Epstein has disappeared in America अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून न्याय विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अधिकृत सार्वजनिक संकेतस्थळावरून एपस्टाईनशी संबंधित किमान १६ महत्त्वाच्या फाईल्स अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांमध्ये असलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो अवघ्या २४ तासांत हटवण्यात आल्याने संशय अधिकच बळावला आहे. विशेष म्हणजे या सर्व फाईल्स एका दिवसापूर्वीच न्याय विभागाच्या वेबसाइटवर सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या पूर्णपणे हटवण्यात आल्याचे समोर आले. ही केवळ तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक काही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, याबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
हटवण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित अनेक छायाचित्रांचा समावेश होता. त्यात त्याच्या घरातील कलाकृती, फर्निचर, वैयक्तिक ड्रॉवर आणि काही आक्षेपार्ह स्वरूपाचे फोटो असल्याचा दावा करण्यात आला होता. याच फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि एपस्टाईनची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्यासोबतचा एक फोटोही होता. हा फोटो अचानक गायब झाल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. फाईल्स हटवण्यात आल्याबाबत न्याय विभागाकडे विचारणा करण्यात आली असता कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले नाही. या मौनामुळे सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी हा प्रकार म्हणजे जनतेपासून महत्त्वाची माहिती लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणावर अनेक डेमोक्रॅटिक खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या गंभीर आणि हाय-प्रोफाइल प्रकरणात सरकारी कागदपत्रे अचानक गायब होणे हे लोकशाही आणि पारदर्शकतेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः ट्रम्प यांचा फोटो हटवण्यात आल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत सार्वजनिक झालेल्या नोंदींमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन तसेच इतर प्रभावशाली व्यक्तींची नावे आढळून आली आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव लिखित स्वरूपात फारसे आढळत नाही, ही बाबही संशयास्पद मानली जात आहे. कारण याआधी उघड झालेल्या काही कागदपत्रांमध्ये, विशेषतः एपस्टाईनच्या खाजगी विमानाच्या फ्लाइट लॉगमध्ये ट्रम्प यांचे नाव समोर आले होते. मात्र ट्रम्प यांनी यापूर्वीच आपला एपस्टाईनच्या गुन्हेगारी प्रकरणांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला असून त्यांच्याविरोधात कोणतेही आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत.