कारंजा न.प. निवडणुकीत एमआयएम चा ऐतिहासिक विजय

नगराध्यक्षपदी फरिदाबानू पुंजानी यांची वर्णी

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Karanja Municipal Election तब्बल १९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर २१ डिसेंबरची पहाट उजाळली आणि निवडणुकीतील विजयाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत पुंजाणी फरीदाबानू मोहम्मद शफी यांनी ११७ मतांनी विजय संपादन केला तर निशाताई विनीत गोलेच्छा यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत ३१ नगरसेवक पदासाठी १२७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यापैकी भाजपा १३, एमआयएम १६, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १ आणि अपक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला.त्यामुळे कारंजा नगर परिषदेत एमआयएम या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले.
 

Karanja Municipal Election 
कारंजा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह ३१ नगरसेवक पदांसाठी शहरातील ८८ मतदान केंद्रांवर २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले होते. एकूण ७० हजार ३३१ मतदारांपैकी ४३ हजार ७०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १२७ उमेदवार असे एकूण १३९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले होते. मतदानानंतर रविवारी २१ डिसेंबर रोजी कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील स्व. प्रकाशदादा डहाके मार्केट यार्ड येथे सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. कडक पोलिस बंदोबस्तात आणि शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणीअंती कारंजा नगरपरिषदेत एमआयएम पक्षाने आघाडी घेत वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक एक अ मधून दुर्गा हेमराज खंडारे, ब मधून फिरोज शेकुवाले, दोन अ मधून वंदना पवन धार्डीकर, ब मधून सत्यजीत कृष्णराव गाडगे, तीन अ मधून खान रुबीना परविन इरफान, ब मधून शेख जाकीर इशाक, चार अ मधून पप्पूवाले हुसेन जंगली, ब.मधून खेतीवाले शाहीन सुभान, पाच अ मधून देंदुळे कांचन यशुदास, ब मधून श्रीवास अजय दशरथ, सहा अ मधून गुल्हाने वैशाली अतुल, ब मधून थद्दाणी सच्चानंद हरिराम,सात अ.मधून अंभोरे सागर रामदास ब मधून राठोड ज्योती प्रवेश क मधून ठाकरे शालिनी प्रशांत, आठ अ मधून कोळकर चंदा भीमराव,ब मधून गायकवाड प्रमोद सदाशिव, नऊ अ मधून अघम कुसुम शालीग्राम,ब मधून गडवाले नितीन अशोक.दहा अ मधून पारेख मोहम्मद इमरान मोहम्मद, ब मधून बेनजिर रहिमा रहमत बेग, ११ अ मधून विरानि सलमान रफिक,ब मधून आसमा परवीन अब्दुल नईम,१२ अ मधून भेलांडे वर्षा मनीष ,ब मधून गढवाले अमोल सुरेश, १३ अ मधून यास्मिन बानो समिउल्लाह खान,ब मधून अहमद नदीम अहमद अनिस, १४ अ.मधून आशिया तरन्नुम अमन शाह,ब मधून खान आणिसाबी बशीरखा, १५ अ मधून पूजानि मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ,ब मधून हसीना बानो इर्शाद अली यांनी विजय संपादन करीत नगरसेवक पदावर आपले नाव कोरले.
यंदा सर्वसाधारण Karanja Municipal Election महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद आरक्षित असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पुंजानी फरिदाबानू मोहम्मद शफी थेट जनतेतून निवडून येणार्‍या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कुणाल झाल्टे व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडली .तर मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार दिनेशचंद्र शुला आणि ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला.
 
 
निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी फटायांची आतिषबाजी करीत आणि मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला.तर पराभूत उमेदवारांनी बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत शांतपणे घरी जाणे पसंत केले. मतमोजणी मुळे शहरातील बायपास परिसरापासून शेतकरी निवास पर्यंत जमलेल्या गर्दीने या रस्त्याला जणू यात्रेचे स्वरूप आले होते.
चौकट....
नगरपरिषदेत एमआयएम ची एकहाती सत्ता
२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी पार पडली. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालानुसार कारंजा नगर परिषदेत एमआयएम पक्षाला नगराध्यक्षपदा सह १६ नगरसेवक पदांवर विजय मिळविता आल्याने कारंजा नगर परिषदेत आता पुढील पाच वर्षांसाठी मतदारांनी एम आय एम ला एक हाती सत्ता दिली आहे.
छायाचित्र - फरिदाबानू पुंजानी एमआयम विजयी उमेदवार