दिग्गज ढासळले, नवखे तरले...

जिल्ह्यात भाजपाचे दोन, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष नगराध्यक्ष

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
भंडारा,
Election Results 2025 सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज आले. हे निकाल आश्चर्यचकित करणारे आणि अनेकांना धक्का देणारे ठरले! भंडारा नगर परिषदेत विद्यमान आमदारांना धोबीपछाड देत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी विराजमान केले. भाजपाने जिल्ह्यातील चार पैकी 2 नगर परिषदेचे अध्यक्षपद जिंकले. तर राष्ट्रवादीने 1 आणि अपक्ष उमेदवाराने एका नगर परिषदेच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली. जिल्ह्यातील शंभर पैकी ५४ नगरसेवकांच्या जागा भाजपने जिंकत नंबर एक असल्याचे सिद्ध केले.
 

Election Results 2025 
 
 
भंडारा जिल्ह्यातील तुमसर पवनी भंडारा आणि साकोली नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दोन डिसेंबर रोजी निवडणूक झाली होती. नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवकांचे भाग्य मतदारांनी मतपेटीत बंद केले होते. आज मतपेट्या उघडल्या आणि अनेक धक्कादायक निकाल पुढे आले. जिल्ह्यातील साकोली आणि भंडारा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. भंडारा येथे भाजपाच्या मधुरा मिलिंद मदनकर तर साकोली देवश्री मनीष कापगते या विजयी झाल्या. मधुरा मदनकर यांनी काँग्रेसच्या यांचा 4 हजाराहून अधिक मतांनी तर कापगते यांनी काँग्रेसच्या सुनीता कापगते यांचा पराभव केला. भंडाऱ्यात भाजपला 35 पैकी 23 नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. शिवसेनेला पाच, काँग्रेसला चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. भंडारा नगरपरिषद अध्यक्षाची निवडणूक शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. शिवसेनेकडून त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात होत्या. विजयाच्या पूर्ण खात्रीने निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मधुरा मदनकर यांना 18727, जयश्री बोरकर यांना 14,679 आणि अश्विनी भोंडेकर यांना 13,103 मते मिळाली. या निकालामुळे आ. भोंडेकर यांना मोठा धक्का बसला. त्यांना नगरसेवकही निवडून आणण्यात यश आले नाही. या विजयामुळे निवडणुकीच्या काळात कायमच चर्चेत राहिलेल्या आ. भोंडेकर आणि भाजपाचे आ. परिणय फुके यांच्या संघर्षात फुकेंचा विजय झाल्याचे बोलल्या जात आहे.
 
 
 
भंडाऱ्यात आजच्या निकालाने अनेक दिग्गजांना पराभव दाखविला. यात राष्ट्रवादीचे सात वेळा नगरसेवक राहिलेले विनयमोहन पशीने, शिवसेनेचे बाबू बागडे, भाजपाचे जाकी रावलानी, बंटी बांगडकर, बंटी मिश्रा यांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने प्रभाग 11 मधून विजयी झाले आहेत.
 
 
पवनी नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या डॉ. विजया नंदुरकर यांनी भाजपच्या भावना भाजीपाला यांचा पराभव केला. हा निकालही अनेकांसाठी आश्चर्याचा होता. तुमसर नगरपालिकेत एका अपक्ष तरुण उमेदवाराने दिग्गजांना पराभूत करीत नगराध्यक्षपदी वर्णी लावली. राष्ट्रवादीचे बंडखोर सादर गभणे यांनी माजी आमदार आणि दोन माजी नगराध्यक्षांना पराभूत केले.अनेकांना धक्का देणारे हे निकाल नवीन लोकांना संधी देणारे ठरले.
 
 
भंडाऱ्यात आक्षेप
 
 
भंडाऱ्यात मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक तीन मधील दोन उमेदवारांची मतेच दिसत नसल्याने शिवसेनेचे संजय कुंभलकर यांनी आक्षेप घेतला. यावेळी बॅलेट युनिट आणण्याची विनंती करण्यात आली. त्यातही सहा पैकी केवळ चारच उमेदवारांची नावे होती. त्यामुळे बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी कुंभलकर यांनी केली आहे.
अपेक्षांवर खरे उतरू : आ. फुके
 
 
जनतेने भाजपावर विश्वास टाकीत नगराध्यक्ष पदासह 23 नगरसेवक निवडून दिले. बहुमताची सत्ता देणाऱ्या भंडारेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भंडाऱ्या चा कायापालट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेच्या अपेक्षेवर खरे उतरण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आ. परिणय फुके यांनी विजयानंतर दिली.