रवींद्र तुरकर
Local Elections गोंदिया जिल्ह्यात चार पैकी तीन आमदार भाजपचे आहेत, यामुळे शहर व जिल्ह्यात भाजपची मजबूत पकड आहे. मात्र असे असताना गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व सालेकसा, गोरेगाव नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे विजय मिळविता आला नाही. याला स्थानिक भाजप पदाधिकार्यांचा अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. चारही स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपची सत्ता आणू अशी वल्गना करणार्या भाजप पदाधिकार्यांच्या भ्रमाचा बुरखा फाटला.
तिरोडा नगरपरिषदेवर भाजपाचे अध्यक्ष निवडून आले असले तरी तेथे राष्ट्रवादीने १२ उमेदवार निवडून आणत वर्चस्व प्रस्थापित केले. गोंदिया नगर परिषदेवर काँग्रेसने वर्चस्व मिळवित नगराध्यक्षसह १४ नगरसेवक निवडून आले. भाजपचे १८ नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. सालेकसा येथे काँग्रेसने नगराध्यक्षसह १० उमेदवार निवडून आणत एक हाती सत्ता मिळविली. गोरेगाव नगरपंचायतीमध्येही काँग्रेसने नगराध्यक्षसह १० नगरसेवक निवडून आणत भाजपला जोरदार धक्का दिला. भाजपच्या पराभवाचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. मागील इतिहास पाहता व अपवादात्मक स्थिती सोडता जिल्हा हा काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिला आहे. आज परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. शहरात तसेच जिल्ह्यात भाजपला मानणारा वर्ग पूर्वीपासून आहे. त्यातल्या त्यात गेल्या दहा वर्षांपासून परिस्थिती बदलली असून अलीकडच्या काळात भाजपात झालेले इन्कमिंग पाहता शहर, जिल्हा पूर्णपणे भाजपमय झालेला दिसून येतो आणि शहरासह जिल्ह्यातून काँग्रेस जवळपास हद्दपारच झाली, असे म्हटले जात होते.
लोकसभा निवडणुकीत Local Elections भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना शहर व जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक भाजप पदाधिकारी बाळगून होते. मात्र त्यांच्या या अपेक्षेवर स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांच्या अतिआत्मविश्वासाने पाणी फेरले व काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी झाले. या पराभवानंतर भाजपने चिंतन, मंथन करून विधानसभा निवडणुकीत जोरदार पूनर्रागमन केले. जिल्ह्यातील तीन विधानसभा काबीज केल्या. एक विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा या चारही ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला अतिशय अनुकूल वातावरण होते. निवडणुकीत प्रचार करण्याची आवश्यकताच नाही, अशा भ्रमात भाजपचे स्थानिक पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपच्या प्रचार व्हायला पाहिजे होता, तो झालाच नाही. मतदार आपल्यालाच मतदान करतील, या भ्रमात भाजपचे पदाधिकारी राहिले आणि त्यामुळेच भाजपला अतिआत्मविश्वास नडला, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.