नगरपालिका–नगरपंचायत निकालात महायुतीची आघाडी!

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Municipal Council-Nagar Panchayat Results राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातच चुरशीचा सामना झाल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांवरून राज्यभरात महायुतीचेच वर्चस्व स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी निवडणुकीसाठी राज्यभर दौरे करत प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. या प्रचाराचा सकारात्मक परिणाम निकालात उमटताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुती 216 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर आघाडीवर आहे.
 
 
Nagar Panchayat Results
 
महायुतीत भाजप 118 जागांवर आघाडीवर असून शिवसेना (शिंदे गट) 60 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 37 जागांवर पुढे आहे. यामुळे भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 33, शिवसेना (ठाकरे गट) 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 8 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय स्थानिक आघाड्यांना 23 जागांवर यश मिळाले आहे.
 
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये मतदान झाले होते. त्यानंतर 2 आणि 20 डिसेंबर रोजी उर्वरित टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू असून बहुसंख्य ठिकाणी महायुती आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद आणि नगरपंचायत निकाल महत्त्वाचे मानले जात असून, याच निकालांच्या आधारे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील युतीची दिशा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.