नागपूरसह विदर्भात सत्तेची कसोटी; नगरपरिषद निकालांकडे राज्याचे लक्ष

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Municipal council results today राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून मतदारांचा अंतिम कौल मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. आज, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी ही निवडणूक सेमीफायनल मानली जात असल्याने राज्यभरात राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः नागपूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येथे 12 नगरपंचायती आणि 15 नगरपरिषदांमध्ये आज निकाल जाहीर होणार आहेत. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशातील प्रभावी नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसकडून सुनील केदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा या निवडणुकांशी जोडली गेली आहे. जरी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जात असल्या तरी आजच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लहान शहरांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
 
 

Municipal council results today 
विदर्भ विभागात एकूण 55 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान झाले असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत भाजपचे अजय अग्रवाल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम आणि काँग्रेसचे शकूर नागानी यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. सावनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या संजना मंगळे आणि काँग्रेसच्या सीमा चाफेकर आमनेसामने आहेत. रामटेक नगरपरिषदेत भाजपच्या ज्योती कोल्हेपरा, शिवसेना शिंदे गटाचे बिकेंद्र महाजन आणि काँग्रेसचे रमेश कारेमोरे यांच्यात चुरस आहे. काटोल नगरपरिषदेत शेकापच्या अर्चना देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा असून त्यांच्यासमोर भाजपच्या कल्पना उमप मैदानात आहेत. कळमेश्वर नगरपरिषदेत भाजपचे अविनाश माकोडे आणि काँग्रेसच्या ज्योत्सना मंडपे यांच्यात थेट सामना आहे.
उमरेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या शालिनी सोनटक्के, काँग्रेसच्या सुरेखा रेवतकर आणि भाजपच्या प्राजक्ता आदमने यांच्यात तिरंगी लढत होत आहे. पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या मोहिनी नाईक, भाजपचे निखिल चिद्दरवार, काँग्रेसचे महंमद नदीम अब्दुल रशीद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल ठाकुर हे प्रमुख उमेदवार आहेत. यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या ॲड. प्रियदर्शनी उईके, काँग्रेसच्या प्रियंका मोघे, शिवसेना ठाकरे गटाच्या वैष्णवी कोवे, शिवसेना शिंदे गटाच्या तेजस्वीनी चांदेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या चंचल मसराम रिंगणात आहेत. भंडाऱ्यात शिंदे शिवसेनेच्या अश्विनी भोंडेकर, काँग्रेसच्या जयश्री बोरकर, भाजपच्या मधुरा मदनकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुषमा साखरकर यांच्यात लढत आहे.
गोंदिया नगरपरिषदेत भाजपच्या कशीश जयस्वाल, शिंदे शिवसेनेच्या प्रशांत कटरे, काँग्रेसचे सचिन शेंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माधुरी नासरे यांच्यात चुरशीचा सामना आहे. बुलडाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या पूजा संजय गायकवाड, आम आदमी पार्टीच्या मनीषा मोरे, काँग्रेसच्या लक्ष्मीबाई काकस आणि भाजपच्या अर्पिता शिंदे यांच्यात निवडणूक रंगली आहे. एकूणच, विदर्भासह संपूर्ण राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोणाचा पराभव होणार, याचा फैसला काही तासांत होणार आहे.