चंद्रपूर,
Nagar Panchayat चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, तब्बल 7 ठिकाणचे नगराध्यक्षपद ताब्यात घेत काँगे्रसने जोरदार आघाडी घेतली आहे. तर भाजपाला केवळ एक नगरपालिका व नगरपंचायतीतच आपले वर्चस्व राखता आले. ही पिछाडी आमदार सुधीर मुनंटीवार यांच्या जिव्हारी लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, वरोडा, गडचांदूर, मूल, भद्रावती, राजुरा, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, घुग्घूस नगरपालिका आणि भिसी नगरपंचायत अशा 11 ठिकाणी निवडणूक झाली. त्याचे निकाल रविवारी जाहीर झाले असून, चिमूर नगरपालिका व भिसी नगरपंचायतीतच भाजपाला आपला झेंडा रोवता आला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा भाजपाचा मोठा पराभव मानला जात आहे.
उलट काँगे्रसने मुसंडी मारत बल्लारपूर, राजुरा, वरोडा, मूल, घुग्घूस, ब्रम्हपुरी व नागभीड नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष विराजमान केला. भद्रावती नगरपालिका शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यात गेली. गडचांदुरात भाजपाचे बंडखोर उमदेवार निलेश ताजने यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपद बळकावले.
गटबाजीला पोषक वातावरण निर्मितीचा परिणाम!
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीतील पराभव मी नम्रतेने स्वीकारतो. विजय झाला तर माजायचे नाही, पराभव झाला तर लाजायचे नाही, हे आमचे सूत्र आहे. काँगे्रसने त्यांच्या स्थानिक नेत्याला शक्ती दिली. आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपूर जिल्हयात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसले आणि त्यातून 9 नगरपालिकांमध्ये आम्हाला पराभवाचे तोंड बघावे लागले. शनिशिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्षा असा आहे ज्याला दरवाजाच नाही. कुणीही येतो. याही गोष्टीचे मुल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू. तसेच आम्हाला जिथे यश आले त्या प्रभागातील जनतेची सेवा करू आणि ज्यांना असे वाटते की आमच्यापेक्षा जास्त विकास विरोधक करू शकतात, तर पुढच्या पाच वर्षात तेही बघतील आणि आम्हीही बघू, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थ मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
लोकविश्वास व लोकशक्तीचा विजय
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिकांमधील विजय हा लोक विश्वास, लोकशक्ती व काँगे्रसच्या विचारांचा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.