गोंदिया,
Gondia Municipal Council जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद तर सालेकसा व गोरेगाव नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, २१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर जाहीर झाला. यात गोंदिया नगर परिषदेत भाजप व काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने तर गोरेगाव व सालेकसा नगर पंचायतींमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली. तसेच सालेकसा व गोरेगाव नगर पंचायतींवर काँग्रेसचा तर गोंदिया नगर परिषदेत काँग्रेसचा व तिरोडा नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व निकालाची प्रतिक्षा आज, २१ डिसेंबर रोजी मतमोजनीनंतर संपली. जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासह ९८ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. तर निवडणूक आयोगाने गोंदियातील ३ व तिरोड्यातील १ अशा ४ जागांचे मतदान पुढे ढकलले. या ४ जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. २ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडण्ाुकीत ९८ जागांसाठी ६४.६९ टक्के मतदान झाले. यात सालेकसा नगर पंचायतीसाठी ८४.९० टक्के, गोरेगाव नगर पंचायतीसाठी ८०.९०, गोंदिया नगर परिषदेसाठी ६१.८६ व तिरोडा नगर परिषदेसाठी ६७.६२ टक्के मतदान झाले. तर उर्वरित चार जागांसाठी २० डिसेंबर रोजी ६३.२९ टक्के मतदान झाले. यात गोंदिया नगर परिषदेच्या ३ जागेसाठी ६२.३६ टक्के व तिरोडा नगर परिषदेच्या १ जागेसाठी ६९.७४ टक्के मतदान झाले. या सर्व १०२ जागांचे निकाल आज, २१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आले. यात गोरेगाव व सालेकसा नगर पंचायतींमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला. तर तिरोडा नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत आणि गोंदिया नगर परिषदेत भाजप १८ जागा, काँग्रेस १४ जागा तर अन्य पक्ष ७ व अपक्षांनी ३ जागा मिळविल्याने येथे सत्ता स्थापनेसाठी राजकीय समीकरणाचा कस लागणार आहे. मतमोजणीदरम्यान सर्वच मतमोजणी केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सर्व विजयी उमेदवार, त्यांचा पक्ष व समर्थकांनी शहरात रॅली काढून फटाक्याची आतषबाजी, डीजे वाजवून विजयी आनंद साजरा केला.
पक्षनिहाय जागा...
गोंदिया नगर परिषद भाजप १८, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस ५, बसपा २, शिवसेना (उबाठा) २, अपक्ष ३
तिरोडा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप ६, शिवसेना (उबाठा) १, काँग्रेस १
गोरेगाव नगर पंचायत काँग्रेस १०, भाजप ५, राष्ट्रवादी काँग्रेस २
सालेकसा नगर पंचायत काँग्रेस १०, भाजप ६, शिवसेना (शिंदे) १
एकूण भाजप ३५, काँग्रेस ३५, राष्ट्रवादी काँग्रेस १९, शिवसेना (उबाठा) ३, बसपा ः २, शिवसेना (शिंदे) १, अपक्ष ः ३
अध्यक्षपद...
गोदिया नगर परिषद सचिन शेंडे (काँग्रेस)
तिरोडा नगर परिषद अशोक असाटी (भाजप)
गोरेगाव नगर पंचायत छोटू बिसेन (काँग्रेस)
सालेकसा नगर पंचायत विजय फुंडे (काँग्रेस)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची सभाही निष्प्रभ
भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेने (शिंदे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदिया येथे सभा घेतली होती. त्यांना हजारो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर या सभाही निष्प्रभ झाल्याचे दिसून आले आहे. आज लागलेल्या निकालात १०२ जागांपैकी भाजला ३५ तर शिवसेना (शिंदे) गटाला फक्त एक जागेवर विजय मिळविता आला. विशेष म्हणजे, गोंदिया, तिरोडा व सालेकसा क्षेत्रात भाजपचे आमदार असताना या तीनही ठिकाणी भाजप उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे ही भाजपसाठी चिंतनाची बाब आहे.