नागपूर,
railway-encroachments : मोतीबाग-इतवारी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने मोतीबाग परिसरात शनिवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईत रेल्वे रुळालगत असलेल्या भीमरत्ननगर भागातील एकूण ३३ बेकायदेशीर झोपड्या पाचपावली पोलिसांनी जमीनदोस्त केल्या. दक्षिण मध्य रेल्वेच्या जमिनीवर अजून ११३ अतिक्रमणे शिल्लक असून संबंधित अतिक्रमणधारकांनी ठराविक कालावधीत जमीन रिकामी न केल्यास, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रियेनुसार उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
अतिक्रमण खाली करण्याची सूचना
मुख्यत: रेल्वेच्या जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून १६० मीटर लांबीतील ३३ पक्की घरे अतिक्रमण केलेली होती. हटविल्या शिवाय विकास कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नव्हते. याबाबत रेल्वे प्रशासनाने वारंवार नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण खाली करण्याची सूचना केली होती. तसेच शनिवारी अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित अतिक्रमण लवकरच हटविले जाणार आहे. जोपर्यंत रेल्वेच्या जागेवरील सर्व अतिक्रमण हटविल्या जात नाही, तोपर्यंत रेल्वे रुळाचे काम हाती येणार नाही. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिस, अभियांत्रिकी विभाग, वैद्यकीय पथक तसेच विद्युत विभागाच्या समन्वयाने ही मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.
३ जेसीबी व १ पोकलेनचा वापर
अतिक्रमण हटाव कारवाईला विरोध केल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही. या कारवाईत शंभराहून अधिक स्थानिक पोलिस कर्मचारी, १० आरपीएफ जवान, ३० अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी तसेच वैद्यकीय व विद्युत पथक तैनात होते. तसेच अतिक्रमणे हटविण्यासाठी ३ जेसीबी व १ पोकलेन वापरण्यात आली.