रियाध,
saudi-arabias-tallest-building दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते, मात्र लवकरच हा विक्रम इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया सध्या बुर्ज खलिफापेक्षा अधिक उंच गगनचुंबी इमारत उभारत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘जेद्दाह टॉवर’ असे नाव देण्यात आले आहे. या इमारतीची उंची तब्बल एक हजार मीटर, म्हणजेच एक किलोमीटर असणार असून ती पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात उंच इमारत ठरेल.

न्यूजच्या अहवालानुसार, जेद्दाह टॉवरचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या बुर्ज खलिफाची उंची ८२८ मीटर आहे, त्यामुळे जेद्दाह टॉवर किमान १७२ मीटरने त्यापेक्षा उंच असणार आहे. बुर्ज खलिफामध्ये १६३ मजले आहेत, तर जेद्दाह टॉवरमध्ये त्याहून अधिक मजले असतील, अशी माहिती समोर आली आहे. saudi-arabias-tallest-building या प्रकल्पाचे बांधकाम २०२५ मध्ये पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्या ‘व्हिजन २०३०’ या महत्त्वाकांक्षी आराखड्याअंतर्गत हा टॉवर उभारला जात आहे. जेद्दाह इकॉनॉमिक सिटीमध्ये उभा राहणारा हा टॉवर आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना ठरेल, असा दावा केला जात आहे.
अहवालांनुसार, आतापर्यंत जेद्दाह टॉवरचे सुमारे ८० मजले पूर्ण झाले असून, सध्या काम वेगाने सुरू आहे. या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मूळ नियोजनानुसार हा प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण होणार होता. २०११ मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काही वर्षांपूर्वी बांधकाम थांबवण्यात आले होते. त्या काळात ६३ मजले पूर्ण झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला पुन्हा कामाला गती देण्यात आली आहे. जेद्दाह टॉवरमध्ये कार्यालये, आलिशान हॉटेल्स आणि निवासी अपार्टमेंट्स असतील. तसेच, इतक्या उंच इमारतीत सहज प्रवास करता यावा यासाठी अतिवेगवान लिफ्ट्सची सुविधा देण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ सौदी अरेबियाच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे.