स्वबळावर लढूनही शिंदेंच्या सेनेचा दणदणीत विजय!50 हून अधिक नगराध्यक्ष निवडून

    दिनांक :21-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Shinde's army wins महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दमदार कामगिरी करत आपला तगडा स्ट्राईक रेट सिद्ध केला आहे. स्वबळावर मोठ्या प्रमाणात लढत देत शिवसेनेने अनेक ठिकाणी विजय मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या कणकवली आणि मालवण या दोन्ही ठिकाणी राणे बंधूंमध्ये थेट राजकीय लढत पाहायला मिळाली. या चुरशीच्या संघर्षात शिवसेनेने भाजपवर मात करत दोन्ही नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. याशिवाय पालघर आणि डहाणू येथेही शिवसेनेने भगवा फडकवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21–0 असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवला. या घवघवीत यशामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
 
 
Shinde
 
सांगोला नगरपालिकेतही राजकीय संघर्ष तीव्र झाला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच गाजले. मात्र निकालात शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एकहाती वर्चस्व मिळवत क्लीन स्वीप साधला. महाड नगरपालिकेत सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत असतानाही भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकांमुळे शिवसेना पुन्हा तळागाळात पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी शिवसेनेने आपल्या इतिहासातील सर्वाधिक ठिकाणी निवडणूक लढवली.
जवळपास 135 ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिले असून त्यापैकी 50 हून अधिक नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला आहे. भाजपसोबत असतानाच शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला असतो, हा समज या निकालांनी खोडून काढला आहे. एकट्याने लढत देऊनही शिवसेनेने दणदणीत यश मिळवले आहे. काही ठिकाणी शिवसेनेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या स्थानिक आघाड्यांनीही विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत शिवसेनेने पाचपट अधिक जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीला मिळालेल्या एकूण जागांपेक्षाही शिवसेनेची कामगिरी सरस ठरली आहे.
विशेषतः कोकणात शिवसेनेने मोठी मुसंडी मारत भाजपला धक्का दिला आहे. मालवण आणि कणकवलीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तर पालघर आणि डहाणूत गणेश नाईक यांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. कणकवली, मालवण, पालघर, डहाणू, सांगोला, महाड, मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड, जुन्नर, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण अशा अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेनेने विजय मिळवत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.