वर्धा,
Wardha Municipal elections पालकमंत्र्यांसह पाच आमदार असलेल्या वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने तीन नगर पालिकांवर झेंडा फडकला. यात हिंगणघाट मतदार संघाने दोन तर आर्वी येथे एक नगराध्यक्ष निवडून आले. देवळी नप अपक्ष तर वर्धा आणि पुलगाव येथे कॅाँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. जिल्ह्यात भाजपाचे नगरसेवक मात्र मोठ्या संख्येने निवडून आले आहेत.
आठ वर्षांपूर्वी झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत सहाही नगर पालिकांवर भाजपाचा झेंडा होता. दुर्देवाने यावेळी तो आकडा ÷अर्ध्यावर आला. हिंगणघाट येथे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयना उमेश तुळसकर तर सिंदी रेल्वे येथे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणी कलोडे विजयी झाल्या. त्यामुळे हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांचे हात अजून बळकट झाले. नयना तुळसकर १८ हजार ७५ तर राणी कलोडे यांचा ११०० मतांनी विजय झाला. आर्वी येथे आ. सुमीत वानखेडे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वाती गुल्हाणे २ हजार १९ मतांनी विजयी झाल्या. वर्धेत काँग्रेसचे सुधीर पांगुळ विजयी झाले. त्यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासुनच आघाडी घेतली होती. पांगुळ यांनी भाजपाचे निलेश किटे यांचा ७ हजार १३६ मतांनी पराभव केला. देवळी येथे शोभा तडस यांचा पराभव करीत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे १ हजार ६२४ मतांनी विजयी झाले. पुलगाव येथे काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर यांनी भाजपाच्या ममता बडगे यांचा १ हजार ७१५ मतांनी पराभव केला. जिल्ह्यात पुलगाव वगळता पाचही नगर पालिकांमध्ये भाजपाला बहुमत आहे. वर्धेत ४० पैकी भाजपाच्या २५, हिंगणघाट येथे ४० पैकी भाजपाच्या २७, आर्वी येथे २५ पैकी भाजपाच्या १५, देवळी येथे २० पैकी भाजपाच्या १६, सिंदीरेल्वे येथे २० पैकी भाजपाच्या ११ तर पुलगाव येथे २१ पैकी ८ नगरसेवक भाजपाचे निवडून आले. जिल्ह्यातील नगरसेवकाच्या १६६ पैकी भाजपाचे १०२ उमेदवार निवडून आले. वर्धा जिल्ह़़्यात ३ नगराध्यक्ष आणि पाच नगर पालिकांमध्ये भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात भाजपाचा सन्मानपूर्वक विजय झाला, असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली. जिल्ह्याती मतदार जनतेने भाजपालाच कौल दिला आहे. ज्या ठिकाणी पराभव झाला, त्याविषयी पक्ष चिंतन करेल, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.